शिवरायांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांना माणसाप्रमाणे जगता आले पाहिजे यासाठीच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी त्यांनी त्याकाळी केलेला राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो. राजा होणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा नव्हती. प्रजेला सुख, समाधान व संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी ते झटत राहिले. राजकर्त्याने कशाप्रकारे राज्यकारभार करावा याचा आदर्श परिपाठ घालून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जगातील सर्वांत मोठा मॅनेजमेंट गुरु म्हणूनही संबोधले जाते. शिवरायांमधील एखादा जरी गुण आत्मसाद करता आला तर आपले जीवन सार्थक होईल, असे प्रतिपादन निवृत्त प्रा. विनायक खवणेकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार वेंगुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. संस्थेचे प्रभारी प्राचार्य तथा आयएमसी ऑफ आयटीआय वेंगुर्लेचे सचिव जगदीश लाडू गवस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा शशांक मराठे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सचिन वालवलकर व महिला काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा परब आदी मान्यवर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक प्रतिमेस व श्री छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर इलेक्ट्रीशियन ट्रेडचा प्रशिक्षणाथ साहील गुरव याने आपल्या पहाडी आवाजात शिवछत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवगर्जना करून जयघोष केला. प्रमुख वक्ते खवणेकर यांनी नागरिक कर्तव्ये व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा स्वीकार, सामाजिक समरसता व पर्यावरण संरक्षण या विषयांना स्पर्श करत आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी सीमा मराठे यांनी सुद्धा विविध ऐतिहासिक बाबींचा दाखला देत आजच्या पिढीने शिवजी महाराजांचे व्यक्तिमत्व का अभ्यासले पाहिजे. महाराजांचा इतिहास, कुटुंब प्रबोधन, तसेच स्वतः व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे कौशल्य व त्यावर आधारित विविध छोटया, घरगुती उद्योगांची माहिती आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांना दिली.
सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर व प्रज्ञा परब यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संस्थेतील संधाता ट्रेडचे शिल्पनिदेशक जोवेल डिसिल्वा यांनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन संस्थेतील ज्येष्ठ शिल्पनिदेशक इलेक्ट्रिशियन प्रसाद कोदे यांच्या नियोजनानुसार करण्यात आले. संस्थेतील प्रशिक्षणाथ व इतर सर्व कर्मचारी यांनीही मेहनत घेतली. सांगतेनंतर उपस्थित मान्यवरांकडून संस्थेच्या आवरात वृक्षारोपण करण्यात आले.