सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार‘ हा चित्रपट केवळ थरारकथा किवा व्यावसायिक सिनेमाचा प्रयोग नाही, तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा, निसर्गप्रेमाचा आणि संघर्षाचा आधुनिक दस्तऐवज आहे. १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांची उत्सुकता आणि तिकीट विक्री दोन्हीही खेचली. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबालकर, गुरू ठाकूर अशा कलाकारांचा दमदार सहभाग, गुरू ठाकूर यांनी लिहिलेली गीते आणि संवाद, तर ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचे दणदणीत प्रयोगशील पार्श्वसंगीत या
सर्वांनी ‘दशावतार‘ला भव्य रूप दिले आहे.
कोकणातील पारंपरिक लोककला ‘दशावतार‘ या चित्रपटाचा गाभा आहे.
‘‘नवरस मी उधळूनीया चरणी तुझ्या
मानुनी घे गोड तुझी रंगपूजा
जरी थकलो नच सुटला संग तुझा
शरण तुला नाही मनी भाव दुजा
अवघे तुझेच दान रे ईश्वरा
खेळ रोज नवा
गोड मानूनी घे रंगपूजा…‘‘
गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या या चित्रपटातील भैरवीप्रमाणे ही लोककला शब्दशः जगते. तळकोकणात दशावतार हा केवळ नाट्यप्रकार नाही, तर तो जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. विष्णूच्या दहा अवतारांच्या आख्यायिका अधर्माच्या विरोधातील संघर्षाचे प्रतीक आहेत. खानोलकर यांनी या प्रतीकांचा वापर आधुनिक कथानकात केला आहे. दिलीप प्रभावळकर साकारत असलेला ‘बाबुली मेस्त्री‘ हा दशावताराला जीवन वाहिलेला वृद्ध कलाकार, प्रत्यक्ष नाटकात रूद्रावतार घेतो आणि गावाच्या संघर्षाला नवा अर्थ देतो. पारंपरिक मंचावरचा हा अवतार पडद्यावर वास्तवाशी भिडतो, तेव्हा नाट्य आणि सत्य यांच्या सीमारेषा पुसट होतात.
चित्रपटाच्या दृश्यभाषेत कोकणचा आत्मा सामावलेला आहे. दगडी कातळशिल्पं, गर्द देवराया, खळाळणारे झरे, सागरकिनारे या सगळ्याने कथानकाला भक्कम आधार मिळतो. कोकणातील लोकांच्या श्रद्धेत देवराई हा केवळ जंगलाचा तुकडा नसून राखणदार देवतेचे अधिष्ठान आहे. त्याला इजा करणे म्हणजे सृष्टीला इजा करणे, अशी श्रद्धा पिढ्यान पिढ्या जपली गेली. ‘देवराई‘, ‘घो मला असला हवा‘, ‘कासव‘, ‘नदी वाहते‘ यांसारख्या आधीच्या चित्रपटांतून ही संकल्पना विविध प्रकारे पडद्यावर आली होती. ‘दशावतार‘मध्ये बाबुलीचा रूद्रावतार हीच भावना जागवतो.
परंतु वास्तवात आज या देवराया, जंगलं, जलस्रोत धोक्यात आले आहेत. महामार्ग, खाणी, प्रकल्प यांच्या आड निसर्गाची नासाडी सुरू आहे. काहींना विकासाचे आमिष, काहींना नोकयांची स्वप्नं पण त्याचवेळी उध्वस्त होत जाणारे डोंगर, विस्थापित गावं, उघडे पडलेले समाजजीवन हे वास्तव दुर्लक्षित होतं. ‘दशावतार‘ने या ज्वलंत प्रश्नांना थेट राजकीय भाष्य केलेलं नसून, कथानकाच्या प्रतीकांतून पर्यावरण आणि विकासाचा ताण जाणवून दिला आहे.
चित्रपट पूर्णपणे मनोरंजनप्रधान आहे. ड्रोनशॉट्स, क्रेनशॉट्स, स्टेडीकॅमचा वापर, आधुनिक ज्कज्र् आणि रंगसंपदा – या सर्वांनी दृश्यदर्जाला उंची दिली आहे. अॅक्शन सिक्वेन्समध्ये संपादनाचा गतीमान वापर, पारंपरिक ढोल-ताश्यांबरोबरच इलेक्ट्राॅनिक ध्वनींनी सजलेले पार्श्वसंगीत, यामुळे प्रेक्षक कथेत गुंतून जातो. तरीही दिग्दर्शकाने केवळ थराराच्या मोहात न पडता, सामाजिक संदेश दडवून ठेवला आहे. ‘बाबुली‘ची भूमिका हे दाखवते की, कलेतून केवळ मनोरंजन नव्हे, तर नैतिकता आणि जबाबदारीची आठवणही दिली जाऊ शकते.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर भिन्न प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तो फक्त दिलीप प्रभावळकरांमुळे लक्षात राहतो असे लिहिले, तर काहींनी हा आमच्या कोकणाचा ‘कांतारा‘ नाही अशी टीका केली. मात्र अनेक समिक्षकांनी ‘दशावतार‘चा मुख्य हेतू अधोरेखित केला – तो लोककलेवर आधारित माहितीपट नसून, एका काल्पनिक कथेला लोककलेचा संदर्भ देणारा व्यावसायिक चित्रपट आहे. या चौकटीत तो उत्तम रितीने यशस्वी झाला आहे. विकास हवा, पण निसर्ग आणि संस्कृतीची मुळे कापून नव्हे. ही ओळ चित्रपटाच्या संदेशाचा गाभा उलगडते. हेच त्याचं वेगळेपण आहे.
‘दशावतार‘सारखे चित्रपट आठवण करून देतात की, लोककला केवळ मनोरंजनासाठी नसून, ती समाजाच्या मूल्यांची, श्रद्धेची आणि संघर्षाची जपणूक करते. त्याच्या गाभ्यातील अधर्माचा नाश आणि धर्माचे रक्षण ही शिकवण तितकीच महत्त्वाची आहे. आजच्या काळात धर्म म्हणजे निसर्गाचा सन्मान, स्थानिकांचा हक्क आणि परंपरेची जपणूक. ही संकल्पना सिनेमा सोप्या भाषेत प्रक्षकांपर्यंत पोहोचवतो.
‘दशावतार‘ हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करतो, पण त्याचवेळी अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. लोककलेच्या रूपकातून विकास पर्यावरण संघर्ष, पिढ्यातील दरी, नातेसंबंधातील द्वंद्व, आणि समाजाची जबाबदारी हे विषय उलगडले जातात. व्यावसायिकतेच्या मोहात कलात्मकता हरवलेली नाही, आणि सामाजिक जाणीव गमावलेली नाही – हीच त्याची खरी ताकद आहे.
म्हणूनच या चित्रपटाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद केवळ सिनेमॅटिक थरारामुळे नाही, तर कोकणच्या संस्कृतीचा व निसर्गप्रेमाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे आहे. ‘दशावतार‘ ही केवळ अवतारकथा नाही, तर लोककलेपासून आधुनिक सामाजिक संघर्षापर्यंतचा प्रवास आहे.
