
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आलेले आदर्श शिक्षक, शिक्षिका व आदर्श शाळा पुरस्कारांचे वितरण १४ रोजी नगर वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी विनोद मेतर (कोचरे-मायणे शाळा) व तेजस बांदिवडेकर (वजराट नं.१) यांना आदर्श शिक्षक म्हणून, निशा वालावलकर (बावडेकर विद्यालय, शिरोडा) यांना आदर्श शिक्षिका म्हणून तर भटवाडी शाळा नं.१ या शाळेला आदर्श शाळा म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते तथा माजी मुख्याध्यापक सत्यवान पेडणेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, सदस्य महेश बोवलेकर आदी उपस्थित होते.
समाजाची जडणघडण करणे हे शिक्षकांचे काम आहे. शिक्षकांनी आपल्या शिक्षकी पेशामध्ये शाळेच्या भिती बोलक्या केल्या पाहिजेत. सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच शिक्षकांनी आपले व्यक्तिमत्वही आदर्शवत ठेवावे, असे मार्गदर्शन सत्यवान पेडणेकर यांनी केले.
शिक्षकांच्या कामाची प्रत्यक्ष पहाणी करूनच नगर वाचनालय ही संस्था पुरस्कार देते. त्यामुळे रत्नापेक्षा रत्नपारखी हा महत्त्वाचा असल्याचे विनोद मेतर म्हणाले. ‘वजराट पॅटर्न‘ म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात माझा एक तरी विद्यार्थी असेल असा माझा संकल्प असल्याचे तेजस बांदिवडेकर यांनी सांगितले. माझ्या कार्याची नाळ ही वेंगुर्ला आहे. विद्यार्थी हेच माझे सर्वस्व व प्रेरणास्थान असल्याचे निशा वालावलकर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. शाळेला मिळालेला पुरस्कार हा आपल्या एकट्याचा नसून तो शैक्षणिक परिवाराचा असून विद्यार्थ्यांना समाजाभिमूख बनविणे हे माझे उद्दिष्ट असल्याचे सीमा तुळसकर म्हणाल्या.
तेजस बांदिवडेकर यांचा संकल्प पूर्ण झाल्यास याच व्यासपिठावर नगर वाचनालयातर्फे त्यांचा भव्यदिव्य सत्कार करण्याचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला कार्यकारी मंडळ सदस्य दीपराज बिजितकर, अॅड.नंदन वेंगुर्लेकर तसेच का.हु.शेख, विशाखा वेंगुर्लेकर, निशिगंधा पवार, कर्पूरगौर जाधव, विष्णू वालावलकर, संजय परब, किरातचे व्यवस्थापक मेघःश्याम मराठे, शिरोडा हायस्कूलचे श्रीराम दिक्षित, श्री. राठीये, जयराम वायंगणकर, मनाली कुबल, भटवाडी शाळेचे शिक्षक जगताप, भाऊ करंगुटकर पालक, विद्यार्थी व इतर मान्यवर तसेच भटवाडी शाळा नं.२ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रद्धा परब, माजी अध्यक्ष उमेश परब, सदस्य सौ.कानडे, आलगुर, धावडे, सौ.गावडे, फर्नांडीस, सौ.फाटक, उपशिक्षक विश्वनाथ जगताप उपस्थित होते.
प्रास्ताविक कैवल्य पवार यांनी केले. सूत्रसंचालन महेश बोवलेकर यांनी तर आभार अनिल सौदागर यांनी मानले.
