वेंगुर्ले-सातार्डा मार्गावर बसफेरी अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनःस्ताप सहन करावा लागत होता. ही बस तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ले आगाराची एकही बस मळेवाडमधून पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गच्या सीमेवरील ग्रामस्थांच्या मदतीला गोव्यातील कदंबा महामंडळ धावून आले आहे. पणजी ते वेंगुर्ले मळेवाडमार्गे अशी बससेवा सुरू करण्याचा निर्णय केटीसीएलने घेत, या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे. यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना मिळाला आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीचा विचार करून केटीसीएलने पणजी ते वेंगुर्ले या मार्गावर बस सेवा सुरू केली आहे. पणजी-म्हापसा-करासवाडा-कोलवाळ-धारगळ-पेडणे-सातार्डा-मळेवाड-शिरोडा-वेंगुर्ले आणि पुन्हा उलट मार्गे ही बस जाणार आहे.
पणजीहून सायंकाळी 4.30 वाजता व वेंगुर्ल्याहून सकाळी 7 वाजता ही बस फेरी असणार आहे. पणजी डेपोचे डीएम गिरीश गौडे, पणजी डेपोचे सर्वजीत बर्वे, एटीएस पणजी डेपो देवीप्रसाद भट, एटीआय पणजी डेपो, केटीसीएलचे इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत या बस फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीनुसार, कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष उल्हास तुयेंकर यांच्या प्रयत्नांनी बस सेवा सुरू केली आहे. वास्को डेपोतून वास्को ते वेंगुर्ले (मळेवाड मार्गे) निघालेली बस वास्को सडा 5.55 वा., वास्को 6 वा., पणजी 7.15 वा. म्हापसा 7.40 वा. आणि त्याच दिवशी परत सकाळी 10.05 वा. अशी सेवा देणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. वेंगुर्ले आगारातून ढिसाळ नियोजनामुळे ही बस सेवा कोलमडली होती. यामुळे विद्याथ, नोकरदार, वयोवृद्ध, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मळेवाड उपसरपंच मराठे यांनीही याबाबत वेंगुर्ले आगाराला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, याचदरम्यान गोवा मदतीला धावून आले. गोवा राज्यातील कदंबा या प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्यामुळे कदंबा प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात असून वेंगुर्ले आगाराच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी स्थानिकांतून व्यक्त केली जात आहे.
