वेंगुर्ल्यात चार ठिकाणी रोबोटिक वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक

जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीवरील झुलता पूल, उभादांडा-मूठ, सागरतीर्थ किनारा व शिरोडा वेळागर किनारा या भागात व्हीएमसीसी इंडिया सर्व्हिस नाशिकचे तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार यांनी स्वयंचलित रोबोटिकचे वॉटर क्राफ्टचे प्रात्यक्षिक दाखविले.

      या स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टचे वजन 22 किलो एवढे आहे. हे यंत्र 1 किमी एवढ्या अंतरावरील बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवू शकते. समुद्रात एक तास रहाण्याची क्षमता त्यात आहे. या रोबोटच्या कुठच्याही भागात बुडणाऱ्या व्यक्तीने पकडले तरी त्यास वाचविण्यात येते. या प्रात्यक्षिकांच्या वेळी स्थानिक नगरपालिका नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सागर सुरक्षा रक्षक, संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका कर्मचारी, कोतवाल, स्थानिक शोध व बचाव गटाचे सदस्य, मच्छीमार, आपदा मित्र, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, जलक्रीडा व्यावसायिक यांना निमंत्रित करण्यात आले होते.

      दरम्यान, शिरोडा-वेळागर येथे काही दिवसांपूव घडलेल्या घटनेवेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वेळागर भेटीत स्थानिक ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यावेळी येत्या आठ दिवसांत स्वयंचलित रोबोटिक यंत्राच्या माध्यमातून बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविण्यासाठी उपयुक्त अशा रोबोटिक यंत्राचे प्रशिक्षण देवून ते यंत्र ग्रामपंचायतीकडे दिले जाणार असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता केलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे कर्तव्याबाबत किनारीवासीय नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Close Menu