कोकणावर हवामानबदलाचे सावट

      कोकणाला निसर्गाने सौंदर्य, संपन्नता आणि समृद्ध संस्कृती दिली. पण हाच निसर्ग आता कोकणवर रागावल्यासारखा वाटतो आहे. गेल्या दशकभरात समुद्र अधिकच आक्रमक झाला आहे. पाऊस आपले वेळापत्रक विसरला आहे आणि शेतकरी, मच्छीमार, व्यापारी, पर्यटन व्यावसायीक या सर्वांच्याच उपजीविकेवर संकटाचे काळे ढग घोंगावत आहेत. हवामान बदल ही आता शास्त्रज्ञांच्या परिषदांपुरती मर्यादित संकल्पना राहिलेली नाही; ती कोकणातील प्रत्येक घराच्या, प्रत्येक हंगामाच्या वास्तवात उतरली आहे.

    गेल्या काही वर्षांत मे-जूनमध्येच वादळांची मालिका सुरू होते, जी पूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरपूर्ती मर्यादित असे. यंदा तर मे महिन्यातच वादळी पाऊस आणि समुद्राचा कहर सुरू झाला आणि दिवाळीपर्यंत तो थांबला नाही. ‘हवामान बदलाचे परिणाम‘ हा शासकीय अहवालातला शब्दप्रयोग आता इथल्या ‘जगण्याचा अनुभव‘ झाला आहे.

          रत्नागिरी, सिंधुदुर्ग किना­यावरची बंदरे गेल्या काही दिवसांत नुसती नौकांनी भरून गेली. स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर घाला घालणा­या अवैध पर्ससीन आणि एलईडी मच्छीमारीला रोखण्यासाठी यंत्रणांची झोप अजूनही पूर्ण उडालेली नाही. परिणाम असा की, पारंपरिक मच्छीमार जीव धोक्यात घालून समुद्रात जातात, कारण बाजारात माशांचे दर वाढतात, पण त्यांची कमाई मात्र घटते. जीव आणि पोट या दोन्हींच्या संग्रामात हे लोक रोज उतरतात.

   पर्यटन हा कोकणच्या अर्थव्यवस्थेचा दुसरा मोठा आधारस्तंभ. पण सलग वादळी पाऊस, वा­याचे झोत, सागरी वाहतुकीवर बंदी यामुळे पर्यटन हंगाम धड सुरू होण्याआधीच कोलमडला. पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला दर्शन. खाडींमध्ये वॉटरस्पोर्ट्स सुरू ठेवणा­या काही मंडळींचा उत्साह टिकला असला तरी पर्यटकांचा हिरमोड झाला. दिवाळीसारख्या गर्दीच्या काळातही कोकणात हॉटेलांचे दर कमी झाले पण पर्यटक थांबले नाहीत. समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले नाहीत.

        शेतीच्या बाबतीत तर दुहेरी आघात बसला. अवेळी पावसामुळे भातपीक वाकले, शेतात उभे राहिलेले पिक वाया गेले. हातातोंडाशी आलेले उत्पादन गमावल्याने शेतक­यांच्या डोळ्यांतील आशा पाणावल्या. फक्त भात नव्हे तर आंबा, सुपारी, फणस, भाजीपाला या सगळ्याच पिकांवर हवामान बदलाने आपले हात साफ फिरवले आहेत.

    सरकारकडे आकडे आहेत, समित्या आहेत, अहवाल आहेत पण कृती कोठे आहे? हवामान बदलाचे कोकणातील परिणाम हे आता फक्त पर्यावरणाचा प्रश्न नाही; तो रोजगार, अर्थव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न झाला आहे. या संकटावर फक्त आपत्ती मदत देऊन निभाव लागणार नाही. धोरणात्मक आणि दीर्घकालीन हस्तक्षेप गरजेचा आहे.

        सर्वप्रथम मासेमारीसाठी कायदे आणि तंत्रज्ञान दोन्ही अद्ययावत करणे आवश्यक आहे. समुद्रात उतरणा­यांच्या सुरक्षेसाठी यंत्रसामग्री, हवामानाची अचूक पूर्वसूचना आणि अवैध मच्छीमारीवर कठोर नियंत्रण हवे. शेतक­यांसाठी हवामान-प्रतिरोधक बियाण्यांचा प्रसार, जलसंधारणावर आधारित शेती, आणि खरी मदत देणा­या विमा योजनांच्या अंमलबजावणीची गरज आहे. पर्यटन क्षेत्रासाठी ‘बारमाही‘ आणि हवामानावर अवलंबून नसणारे मॉडेल्स उभे करणे गरजेचे आहे. जसे की ग्रामीण, निसर्ग, कृषी पर्यटन किवा स्थानिक वारसा केंद्रीत प्रकल्प. गोव्याच्या धर्तीवर नाही, तर कोकणच्या स्वतःच्या परंपरा, चवी, संस्कृती आणि कलात्मक वारशावर आधारित पर्यटन हेच टिकाऊ ठरेल. सिंधुदुर्गातील ‘सी-वर्ल्ड‘सारखा प्रकल्प विकसित करण्याचे स्वप्न आता केवळ प्रस्तावात न राहता प्रत्यक्षात आणावे लागेल. कासव जत्रा, पतंग महोत्सव, फूड फेस्टिवल अशा संकल्पनावर आधारित पर्यटन उपक्रमांना शासनाकडून प्रोत्साहन, प्रसिद्धी आणि आर्थिक सहकार्य मिळाले तर या व्यवसायाला चालना मिळेल.

         हवामान बदलावर मात करण्यासाठी शासन, स्थानिक संस्था, संशोधक आणि नागरिक यांचा एकत्रित सहभाग आवश्यक आहे. ग्रामपातळीवर हवामान साक्षरता निर्माण झाली पाहिजे. पावसाचे दिवस कमी झाले पण पाऊस वाढला, उन्हाळा दीर्घ झाला पण आंबा मोहरला नाही अशा निरीक्षणांचा दस्तऐवज तयार झाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यात हवामान बदल प्रतिसाद योजना (क्थ्त्थ्र्ठ्ठद्यड्ढ ङड्ढद्मद्रदृदद्मड्ढ घ्थ्ठ्ठद) कार्यान्वित झाली पाहिजे.

      कोकण हे महाराष्ट्राचे फुफ्फुस आहे – त्याच्या किना­यांवरील जीवसृष्टी, जंगलं, नद्या, खाड्या आणि शेती ही राज्याच्या पर्यावरणीय संतुलनाचा कणा आहेत. त्या कण्याला तडा गेला तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्यावर होईल. आज कोकणावर आलेले हे सावट फक्त कोकणाचे नाही; ते संपूर्ण समाजाला दिलेला इशारा आहे.

      हवामान बदलाच्या या त्सुनामीसमोर कोकणाला वाचवायचे असेल, तर आपत्तीला सुयोग्य प्रतिसाद देणारे ‘प्रोऍक्टिव्ह‘ प्रशासन हवे. कारण निसर्गाचा राग जेव्हा संतापात बदलतो, तेव्हा माणसाचे सारे तंत्रज्ञान आणि सर्व योजना पाण्यात जातात. कोकण अजूनही उभा आहे, पण हादरलेला आहे. आता त्याला आधार हवा संवेदनशील, शास्त्रीय आणि दूरदृष्टी असलेल्या शासनाचा आणि जागरूक समाजाचा.

Leave a Reply

Close Menu