
आनंदयात्री वाङमय मंडळ वेंगुर्ला या संस्थेतर्फे कलावलय वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, किरात ट्रस्ट, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच वेंगुर्ला, समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग व वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साई मंगल कार्यालय येथे ‘वस्त्रहणर‘कार गंगाराम गवाणकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसमा घेण्यात आली. स्वतः मालवणी नसतानाही गंगाराम गवाणकर यांनी मालवणी भाषेतील नजाकत नेमक्या ढंगात ‘वस्त्रहरण‘ या जगप्रसिद्ध नाटकात वापरून इतिहास घडवला. एखाद्या बोलीभाषेतील नाटकाचे पाच हजाराहून अधिक प्रयोग भारतासह सातासमुद्रापारही होतात हे खुप मोठे भूषण आहे. ‘नाना‘ या नावाने सर्वांना परिचित असलेले गवाणकर आज आपल्यात नाहीत ही भावना त्रास देणारी आहे. त्यांच्या जाण्याने मालवणी साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना शोकसभेतून व्यक्त झाल्या.
मालवणी भाषेला रंगभूमीवर आणून तिची प्रतिमा व प्रतिभा जगभर वाढविली. एक अभ्यासू लेखक, दिग्दर्शक व कलाकार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती, असे यावेळी वृंदा कांबळी म्हणाल्या. ज्येष्ठ रंगकर्मी संजय पुनाळेकर यांनी त्यांच्या सानिध्यातील विविध आठवणी कथन केल्या. यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, डॉ.आनंद बांदेकर, प्रा.डॉ.सचिन परूळकर, कलावलयचे अध्यक्ष सुरेद्र खांबकर, संजय पुनाळेकर, वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपेश परब, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, भरत सातोसकर, किरात ट्रस्टचे सुनील मराठे, कलावलयचे माजी अध्यक्ष रमेश नार्वेकर, आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे राजाराम नाईक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सामाजिक कार्यकर्ते आदित्य खानोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष महेश राऊळ, व्यंगचित्रकार, लेखक संजय घोगळे, आनंदयात्रीच्या पदाधिकारी वृंदा गवंडळकर, ग्रामीण पत्रकार सुनील सातार्डेकर आदी उपस्थित होते.
प्रदीप सावंत, डॉ.प्रा.सचिन परूळकर, रमेश नार्वेकर, महेंद्र मातोंडकर, प्रसन्ना देसाई, संजय घोगळे, महेश राऊळ, डॉ. आनंद बांदेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले.
