“राजकारणातील भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी’ पुस्तकाचे प्रकाशन

भारतीय राजकारणातील महापुरूष भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांच्या जन्मदिनानिमित्त लेखक नागेश सू.शेवाळकर यांनी लिहिलेल्या “भारतीय राजकारणातील भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या हस्ते नांदेड येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी हे होते तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भगवान अंजनीकर, डॉ.रवींद्र तांबोळी, राम तरटे, किरण गोटीमुकुल, विजय चितरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखक नागेश शेवाळकर यांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. मनोगतात शेवाळकर यांनी पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा बोलून दाखविली. रवींद्र तांबोळी व भगवान अंजनीकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रा.लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अशा कार्याचा महामेरू असलेल्या आणि नीतिमान व शिस्तीच्या महापुरूषांची चरित्रे विद्यार्थी व सर्वांसाठीच प्रेरणादायी असतात. अशा प्रकारची चरित्रे लेखक शेवाळकर हे लिहीत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे असे त्यांनी म्हटले व लिखाण कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन पंडित पाटील बेरळीकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu