दोडामार्ग-शिरवल येथील 92 वर्षाचे वयोवृद्ध वाचक एस.के.गवस यांना प्रचंड ग्रंथ वाचनाची आवड. मात्र वयोमानामुळे त्यांना बाहेर जाऊन ग्रंथ खरेदी करणे शक्य नाही आणि त्यांना घरी सोबत करण्यासाठीही कोणी नसल्यामुळे कणकवली येथील “प्रभा’ प्रकाशनातर्फे शंभर ग्रंथ त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट देण्यात आले. यावेळी “प्रभा’ प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर, प्रसिद्ध साहित्यिक संजय तांबे, मधुकर मातोंडकर आणि कवी हरिश्चंद्र भिसे आदी उपस्थित होते.
साहित्यिक संजय तांबे यांचा “किरात साप्ताहिक’ मध्ये प्रसिद्ध झालेला “तमसोमा ज्योतिर्गमयम’ हा लेख एस.के.गवस यांच्या वाचनात आला. त्या लेखाच्या खाली तांबे यांचा संपर्क नंबर होता. त्या नंबरवर गवस यांनी तांबे यांच्याशी संपर्क करून वाचनाची खूप आवड असून वयामुळे बाहेर जाऊन पुस्तके खरेदी करणे शक्य नाही तसेच घरी पुस्तके आणून देणारीही कोण व्यक्ती नाही अशी खंत व्यक्त केली. ही माहिती “प्रभा’ प्रकाशनाचे संचालक अजय कांडर यांना तांबे यांनी देताच “प्रभा’ प्रकाशनतर्फे शंभर पुस्तके गवस यांना वाचनासाठी त्यांच्या घरी भेट देऊन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संजय तांबे आणि हरिचंद्र भिसे यांनीही आपली प्रकाशित झालेली पुस्तके गवस यांना भेट दिली.
गवस हे मुंबई येथे पीएसआय म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते गावी दोडामार्ग शिरवल येथे आले. मात्र मुळातच वाचनाची आवड असणा¬या गवस यांची गावी वाचनाची उपेक्षा झाली. वयामुळे ते बाहेर जाऊ शकत नव्हते आणि बाहेरून पुस्तके आणून देणारीही व्यक्ती त्यांना कोण सापडत नव्हती. या पाश्र्वभूमीवर “प्रभा’ प्रकाशनाने त्यांना दिलेली पुस्तकांची भेट महत्त्वाची मानली जात असून याबद्दल श्री. गवस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
