रविद्र मालुसरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रणरागिणींचा पराक्रम आणि स्त्रीशक्तीची परंपरा नव्या पिढीपुढे उभी करण्यासाठी श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात वार्षिक सोहळा शेकडो विद्यार्थी, पालक आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत समाजकार्याचा पाया ठरावेत, या ध्येयाने कार्य करणा-­यांना दिला जाणारा ‘सुभेदार वीर तानाजी मालुसरे सन्मान पुरस्कार २०२५‘ मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक रविद्र मालुसरे यांना प्रदान करण्यात आला. स्वराज्य हे शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते सत्यात उतरवले, संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. या यज्ञात असंख्य मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्र धर्म काय असतो हे जगाला कळाले. या इतिहासाचा विसर मराठी माणसाला पडता कामा नये. मालुसरे कुळात जन्म झाल्याने सुभेदारांचा इतिहास पुढे आणणे हे मी कर्तव्य समजतो आहे असे सत्काराला उत्तर देताना रविद्र मालुसरे म्हणाले. यावेळी सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक प्रविण भोसले, विशेष पाहूणे एनएसजी कमांडो नरेश पवार, संस्थेचे प्रमुख डॉ. हेमंतराजे गायकवाड, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष विजय कदम, ज्येष्ठ पत्रकार राजन देसाई, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक दिलीप दळवी, रामचंद्र जयस्वाल, राजेंद्र मालुसरे, जयवंत मालुसरे, संजय धामापूरकर, अजय नागवेकर उपस्थित होते.

      सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय शिवकालीन रणरागिणी निबंध स्पर्धेत प्रथम- डॉ.अनुज केसरकर (मुंबई), द्वितीय- प्रा.प्रशांत शिरूडे (ठाणे), तृतीय- सुमिता पवार (मुंबई), उत्तेजनार्थ – स्नेहल चव्हाण (रत्नागिरी) व हिमांशू शुक्ल (जळगाव) यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर, युक्ता गोठणकर व आरती लोखंडे यांनी केले. आर्णा सुर्वे, साक्षी निर्मल, गौरव गायकवाड, समिक्षा बिळीगुदरी व साहिल धाकतोडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu