वक्तृत्व स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे यश

    बारामती विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘लेक्स कनेक्ट‘ या ‘लॉ फेस्ट‘अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील पोस्टर मेकिग, पथनाट्य, वादविवाद, वक्तृत्व तसेच मुट कोर्ट स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजच्या पृथ्वीराज एकले आणि एलविना फर्नांडिस यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

      पृथ्वीराज एकले याने ‘नागरिकशास्त्र‘ हा विषय शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे या तीनही पातळीवर अत्यावश्यक आहे का? या विषयासंदर्भात मराठीमध्ये तर एलविना फर्नांडिस हिने कायदा क्षेत्रातील ‘एआयचा वाढता वापर आणि भविष्यातील आव्हाने‘ या विषयावर इंग्लिशमधून आपली मते प्रभावीपणे सादर करून दोघांनीही मराठी आणि इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेमधे प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांनाही बारामती लॉ कॉलेजकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

      सदर स्पर्धेसाठी पृथ्वीराज व एलविना यांना सहाय्यक प्रध्यापक शांभवी तेंडोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उत्तुंग यश मिळवल्याबद्दल  लॉ कॉलेज कुडाळ आणि सहभागी स्पर्धक, मार्गदर्शक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu