आगामी होऊ घातलेल्या जि.प., पं. स.च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील महिला काथ्या संस्थेच्या कार्यालयात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकायांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची कार्यकर्त्यांची तयारी आहे. जर मित्रपक्षांनी आम्हाला सोबत घेतलं नाही तर निश्चितच आम्ही मागे राहणार नाही. स्वबळावर लढायला आम्ही तयार आहोत. स्वबळावर लढणार हे इतर पक्षांचे काही स्थानिक पदाधिकारी बोलतात. मात्र वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारच्या चर्चांवर निर्णय घेतले जातील. त्यामुळे स्वबळाच्या चर्चांवर आपण जास्त महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला कोकण विभागीय निरीक्षक माया कटारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक दिशा दाभोळकर, पनवेल शहर महिला अध्यक्ष प्रज्ञा चव्हाण, प्रदेश सरचिटणीस एम.के.गावडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोणत्या पदाधिकायाला त्याच्या भागात किती जनमानसाची साथ आहे, याबाबत या बैठकीत माहिती घेण्यात आली.
