वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक निरीक्षक विवेक घोडके यांच्या उपस्थितीत तसेच निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओेतारी व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्यामार्फत करण्यात आली. यावेळी अर्ज दाखल केलेले सर्व उमेदवार मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या छाननीवेळी कोणत्याही उमेदवाराने दुस¬या उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे ही छाननी प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिका¬यांनी दिली.
या निवडणुकीत भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस, उद्धव सेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष यांच्याकडून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. पक्षाकडून अर्ज दाखल केलेल्यापैकी ज्या उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही, त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या आठ अर्जांपैकी सहा अर्ज वैध ठरले. यामध्ये भाजपाचे दिलीप गिरप, शिवसेनेचे नागेश गावडे, काँग्रेसचे विलास गावडे, उद्धवसेनेचे संदेश निकम, अपक्ष नंदन वेंगुर्लेकर व सोमनाथ टोमके यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर भाजपाकडून अतिरिक्त दाखल केलेल्या विनायक गवंडळकर व शिवसेनेकडून अतिरिक्त दाखल केलेला बुधाजी उर्फ उमेश येरम यांचे उमेदवारी अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले.
नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या 113 उमेदवारी अर्जांपैकी 24 उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने 89 उमेदवारी अर्ज वैध घोषित करण्यात आले. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 21 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत नेमके किती उमेदवारी अर्ज मागे घेतात व किती प्रत्यक्ष लढती होतात हे स्पष्ट होणार आहे.
