सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. व सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्रामध्ये 14 नोव्हेंबर ते 2025 अखेर सहकारी सप्ताह साजरा होत आहे. याचा शुभारंभ 19 नोव्हेंबर रोजी मठ येथील श्री स्वयंमेश्वर विकास सेवा संस्थेमध्ये सहकार मेळावा आयोजित करून करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सहकार अधिकारी श्रेणी-1चे आर.टी.चौगुले, जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष गजानन सावंत, संचालक एम.के.गावडे, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, भोगवेचे माजी सरपंच महेश सामंत, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रमण वायंगणकर आदी उपस्थित होते.
तरूण वर्गाने सहकारी संस्थांमध्ये समाविष्ट होऊन बेकारी कमी करण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू केले पाहिजेत. ग्रामीण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करावी. पारंपरीक शेती व्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादने वाढवावीत. सर्वांनी संघटित हाऊन सहकाराच्या माध्यमातून आपल्या गावचा सर्वांगिण विकास साधावा असे आवाहन आर.टी.चौगुले यांनी केले. सहकारी चळवळीतील सहकार संस्थेमधील या पवित्र क्षेत्रामध्ये आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी काम करीत आहोत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे पारदर्शकपणे काम करून आपली संस्था नावारूपाला कशी येईल यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्रातील सर्व प्रकारच्या संस्थांना जिल्हा बँकेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल मिळालेल्या या संधीचा सदुपयोग केला पाहिजे. तसेच सहकारी संस्थातील पदाधिकारी, कर्मचारी यांनी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे मनिष दळवी यांनी सांगितले. कोकणातील निसर्गाचा पुरेपुर वापर करून कृषी पर्यटनावर सहकाराच्या माध्यमावर चालना देण्यात यावी, असे महेश सामंत यांनी सूचित केले. तर एम.के.गावडे यांनी सहकार वाढीसाठी करावयाचे प्रयत्न याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक सहकार बोर्डाचे विकास अधिकारी मंगेश पांचाळ यांनी केले. मेळावा पार पाडण्यासाठी श्री स्वयंमेश्वर सोसायटीचे अध्यक्ष सुभाष बोवलेकर यांचे सहकार्य मिळाले.
