कोकमसाठी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई

मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 904 शेतकऱ्यांचे 101.65 हेक्टर आर एवढे क्षेत्र बाधित झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकूण 30,02,685 रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून 30,03,000 एवढी नुकसानभरपाई महसूल व वन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्र्थ्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन शेतकरी न्याय हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गावडे यांनी केले आहे.

      सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसामुळे कोकम पिकाचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील 9 शेतकऱ्यांचे 0.45 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना रु. 20,500, सावंतवाडी तालुक्यातील 94 शेतकऱ्यांचे 8.78 हेक्टर जार बाधित क्षेत्र असून त्यांना रु. 2,84,830, वेंगुर्ले तालुक्यातील 320 शेतकऱ्यांचे 26.32 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना 10,10,745, कुडाळ तालुक्यात 263 शेतकऱ्यांचे 32.08 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना रु. 8,32,125,  मालवण तालुक्यातील 118 शेतकऱ्यांचे 16.34 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना 4,19,660 कणकवली तालुक्यातील 60 शेतकऱ्यांचे 14.63 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना रु 3,46,460, देवगड तालुक्यातील 30 शेतकऱ्यांचे 206 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना रु. 40,740, वैभववाडी तालुक्यातील 10 शेतकऱ्यांचे 0.99 हेक्टर आर बाधित क्षेत्र असून त्यांना रु. 47,625 अशी एकूण 10,10,745 रुपयांची नुकसान भरपाई रक्कम शासनाकडून मंजूर झाली आहे.

      वेंगुर्ले शेतकरी न्याय हक्क संघटनेच्यावतीने कोकम पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून वेळोवेळी मागणी लावून धरली होती. त्याप्रमाणे शासनाने नुकसानग्रस्त कोकम उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली आहे. वेंगुर्ले तालुक्यासाठी 10 लाख 10 हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून हा आकडा इतर तालुक्यांपेक्षा मोठा आहे. शेतकऱ्यांनी जागरूक राहून कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर ही मदत आपल्या खात्यात जमा करून घ्यावी, असे गावडे यांनी म्हटले आहे.

      राज्यात मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे वेेंगुर्ले तहसीलदार कार्यालयात अद्याप प्राप्त झालेले नाहीत. हे अनुदान लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या अनुषंगाने ई-पोर्टलवर यादी अपलोड करणे अशक्य असल्याने सोबत दिलेल्या नमुन्यात अचूक गट क्रमांक, खाते नंबर, नुकसानग्रस्तांचे नाव, आधार नंबर, मोबाईल नंबरसह इंग्रजी अक्षरांत सॉफ्ट कॉपी सादर करावी. मे 2025 या महिन्यात नुकसान झाले नसेल तर निरंक रिपोर्ट सादर करण्यात यावा, असे पत्र वेंगुर्ले तहसीलदार यांच्याकडून 3 नोव्हेेंबर रोजी वेंगुर्ले तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

      वेंगुर्ले तालुक्यात अवकाळी पाऊस 20 मे ते ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरूच राहिल्यामुळे भातशेती प्रचंड नुकसान झाले व शेतकरी देशोधडीला लागला. भातशेती कापणीसाठी तयार झाली असताना ऐनवेळी पावसाने हाहाकार केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी वेेंगुर्ले तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेने व विविध शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सतत कृषी विभाग जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागणी केली होती. या मागणीनुसार गुंठ्याला एक हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जागरूक होऊन आपल्या गावातील, विभागातील कृषी अधिकारी यांच्याकडे आपले सातबारा, आधारकार्ड, बँक खाते यांची माहिती त्वरित देऊन नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.

      ई-पीक पाहणी नेोंदणी शेती ॲपवर करणे गरजेचे होते, परंतु सध्या सर्व्हर डाऊन असल्याने किंवा सर्व्हरमधील काही अडचणींमुळे गेले दोन ते तीन महिने शेतकरी अद्यापही पीक पाणी करू शकलेला नाही. त्यामुळे कृषी विभाग व वेेंगुर्ले तहसीलदार यांनी ही बाब लक्षात घेऊन याच्यामध्ये सूट देऊन तलाठी यांना सांगून पेनाने पीकपाणी नोंदी घेण्यात यावी. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल, असे संजय गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu