अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या जनहित याचिकेनंतर अखेर शासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मागणीला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा आता अधिक सक्षम होणार आहे.
नवनियुक्त डॉक्टरांचे सामाजिक संस्थांकडून पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यामध्ये अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, युवा रक्तदाता संघाचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्यासह तुषार विचारे, राजू केळुसकर, किशोर चिटणीस, अमित अरवारी, विनोद वालावलकर आदींचा सहभाग होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. वजराटकर, डॉ. चौगुले आणि समुपदेशक सुनील सोन्सुरकर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना विश्वास दिला ‘सावंतवाडीची जनता प्रेम देणारी आहे. सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी ही जनता भक्कमपणे उभी राहते. कुणालाही त्रास होणार नाही; काही गैरसोय वाटली तर हक्काने हाक द्यावी.’ या आश्वासनाने डॉक्टरांमध्ये समाधान आणि प्रेरणा दिसून आली.
नवे रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी- डॉ. बाळासाहेब नाईक, डॉ. अलफान आवटे, डॉ. ओंकार कोल्हे, डॉ. विघ्नेश चाकोरे, डॉ. गोपाळ गोटे, डॉ. प्रिया वाडकर, डॉ. क्रांती जाधव, डॉ. श्लोक हिरेमठ, डॉ. टी. कगनुलकर. सर्व डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. डॉक्टरांनीही यावेळी रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्याचे आणि उपलब्ध सोयींचा सर्वोत्तम वापर करण्याचे आश्वासन दिले.
उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या सातत्यपूर्ण आरोग्यविषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या संस्थांचे सहकार्य नेहमीच उपयुक्त ठरते; असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक सुनील सोन्सुरकर यांनी केले.
