लहानपणी अनेक गोष्टींचा आपल्या मनावर प्रभाव पडलेला असतो. म्हणजे आपण त्या गोष्टींशी समरुप झालेलो असतो. त्या कथा कुठेतरी आपल्या मनात जाऊन रुतलेल्या असतात. कथेतील निरनिराळी पात्र आपल्यासोबत येऊन खेळत असतात. बोलत चालत असतात. चंपक, चांदोबा, ठकठक, विक्रम वेताळ अशा कित्येक पुस्तकांचं त्यातल्या गोष्टींचं स्थान आपल्या मनात अढळ झालेलं आहे. एक नातं बनलेलं आहे. अशातीलच एक कथा म्हणजे सिंड्रेला, हिमगौरी आणि सात बुटके. सिंड्रेलाचा बूट, सिंड्रेलाच्या कथा एकूणच परीकथा, हे लहानपणीचं आपलं आवडतं पंचपक्वान्न. अशा अनेक परिकथा आपल्या आवडीच्या. तर विषय हा, की नाओमी आणि सात मुखपट्ट्या ही अशीच काहीशी परिकथा वगैरे असावी का? तर नाही. ही परिकथा वगैरे नाही. हे आहे एक जीवंत, धगधगतं वास्तव. ज्या वास्तवाच्या आगीत होरपळून गेलेल्या कित्येकांचा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणणा-या एका मुलीची गोष्ट. हो, एका परीची गोष्ट, परीकथा. पण तीसिंड्रेला सात बुटक्यांसोबत होती. हीसिंड्रेला मात्र सात मुखपट्ट्या घेऊन येते. ज्या आपलं तोंड व माणूस असणंच उघडं पाडतात.

      २०२० ची अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा गाजली ती मुख्यत्वे दोन कारणांमुळे. पहिलं म्हणजे या स्पर्धेने दोन नवे विश्वविजेते जगाला दिले. टेनिस जगतात यापूर्वी पुरुषांमध्ये रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल यांचे तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्सचे निर्विवाद वर्चस्व होते. परंतु यंदाच्या स्पर्धेत दोन नवी नावं जगाला मिळाली. पुरुष एकेरीत ऑस्ट्रियाचा डॉनिमिक थिम आणि महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका.दुसरं कारण म्हणजे या नाओमीनं वापरलेल्या सात मुखपट्ट्या म्हणजे मास्क‘. या मुखपट्ट्या काही साध्यासुध्या नव्हत्या. यात अवघा मानवजातीचाच काळा इतिहाससामावलेला होता. फ्लाइड लॉइड या कृष्णवर्णीयाच्या हत्येचा निषेध म्हणून वर्णद्वेषाला बळी पडलेल्या एकूण सात जणांच्या मुखपट्ट्या तिने यंदाच्या स्पर्धेत घातल्या. खेळाचा स्तर उंचावताना तिने हा समाजिक संदेशही दिला. तिच्या या कृत्याचा निरनिराळ्या स्तरातून गौरव करण्यात आला. जपानमध्ये तसेच खुद्द अमेरिकेतही तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ घडून आली. खरंतर, नाओमी स्वतः कृष्णवर्णीय आहे. पण तिला कधी वर्णद्वेषाचा सामना करावा लागला नाही. परंतु, या वर्णद्वेषातून मी सुटू शकले. तरीही माझे कित्येक बांधव यात बळी पडलेत, हे सामाजिक भान असण्याएवढी तिची बुद्धिमत्ता निश्चितच होती आणि आहे. त्यामुळेच हा विषय तिने जागतिक स्तरावर अधोरेखित केला आणि पुन्हा एकदा वर्णभेदाचा मुद्दा ठळक झाला.

      तसं म्हटलं, तर हा विषय काल परवाचा नाहीय. हा कित्येक दशकं, शतकं चालत आलेला एक पुरातन विषय आहे. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं दिसतील, जिथे वर्णभेदामुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला. कित्येकांची स्वप्न बेचिराख करण्यात आली. जाती व्यवस्था, श्रेष्ठ कनिष्ठची संकल्पना, मॉब लिंचिंग, अस्तित्वासाठी आणि अस्मितेसाठी चाललेली जीवघेणी लढाई अशाप्रकारचे कित्येक प्रकार या वर्णद्वेषाने जन्माला घातले. जगातील सा-याच देशांत याचे ठळक पुरावे सापडतील. नाओमी मुखपट्ट्यांद्वारे हाच मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर घेऊन येते. पण अशी तिला काय गरज? सारं काही अगदी नीटनेटकं, व्यवस्थितरित्या चाललेलं. खेळून पैसा मिळतोय. घरं चालतंय. सगळ्या इच्छा आकांशा चट्दिशी पूर्ण होतात. शिवाय तिला किवा तिच्या कुटुंबाला अशा जहरी वर्णभेदाचा सामना कधी करावा लागला नाही. तिचा सामना फक्त टेनिस कोर्टवरील प्रतिस्पर्ध्याशी. मग तिला काय गरज पडली असेल? आपल्याकडे तर असं कधी होत नाही. आपण सुखात तर जग सुखात. बाकीचे मरताहेत, तर मरुदे की. आपण कुठं आणि काय काय करणार? आपल्यावर किवा आपल्या कुणा जीवलगावर असा काही बाका प्रसंग आला, तरच आपण हालचाल करावी, हे ब्रह्मज्ञान आपले थोर राजकारणी वगैरे मोठे लोकं आपल्याला देऊन जातात. पण इथे नाओमी याचं उत्तर स्वतःच देते. टेनिसच्या व्यासपिठावरून ती जगाला ठणकावून सांगते, ‘‘खेळाडूंनी राजकारणात न पडता केवळ मनोरंजन करावे, या विचारांचा मी निषेध करते. हा मानवी अधिकारांचा विषय आहे. मी स्वतः कृष्णवर्णीय आहे. त्यामुळे कृष्णवर्णीयांवर झालेल्या अत्याचारांबाबत मी नेहमी आवाज उठवणार.‘‘ नाओमी इथे ग्रेट वगैरे ठरते, असं मला म्हणायचं नाही. पण ती ग्रेटाठरते, हे मात्र खरं. नाव, पैसा मिळाला, तरी ती तिचं कर्तव्य विसरत नाही, हा तिच्यातील माणूस जीवंतअसल्याचा पुरावा म्हणावा लागेल. बाकी खेळाडू-अभिनेता-अभिनेत्री काय, आपल्याकडे सारेच राजकारणात पडलेले. त्यामुळे आम्हांस अधिक सांगणे न लगे.

      या वर्णद्वेषी संघर्षाचं मूळ काय? याचा विचार केला, तर इथे पुन्हा डार्विनची उत्क्रांती समोर येते. जो प्राणी ताकदवान असतो, तो लहान प्राण्यांवर आपली पकड ठेवत असतो. कारण त्याला अजून मोठं व्हायचं असतं. आपलं स्थान अजून प्रबळ करायचं असतं. कारण ज्याचं स्थान डळमळीत होतं, त्याला जगण्यासाठी खुप मोठा संघर्ष करावा लागतो. यातूनच वर्णद्वेष निर्माण झाला असावा. प्राचिन काळच्या टोळी संघर्षात जी टोळी विजयी होईल, ती हरलेल्या टोळीला आपला गुलाम बनवायची. तिथून गुलाम प्रथा चालू झाली ती आजतागायत निरनिराळ्या प्रकारात सुरुच आहे. मग मालकाच्या रुपात व्यापारी असतील किवा सरकारही असू शकेल. हा संघर्ष वेगवेगळ्या रुपात दिवसेंदिवस वाढतच गेलेला दिसून येईल. आपल्या भारताचा पुरातन इतिहास पाहिला, तर आर्य-द्रविड वाद हा वर्णभेदाचा खुप मोठा संघर्ष आपल्याकडे आहे. अनेक लढाया, युद्ध या संघर्षाचा परिणाम आहेत. देव आणि राक्षस ही संकल्पना मुळात या वर्णभेदामुळेच जन्माला आली. इथल्या ख-या मालकांना गुलाम बनवलं गेलं आणि त्यांचं रुपांतर राक्षसांत केलं गेलं. नंतरच्या काळात चार वर्ण निर्माण झाले आणि त्यांनी या व्यवस्थेला अजून खतपाणी मिळालं. जे त्याकाळात आर्यांनी केलं, तेच आधुनिक काळात ब्रिटिशांनी केलं. फरक एवढाच, की त्यांच्यालेखी कोणी आर्य, द्रविड नव्हता. श्रेष्ठ, कनिष्ठ नव्हता. तर सगळेच गुलाम होते. काळे होते. हल्लीच्या काळात घडणा-या मॉब लिचिंग, अस्पृश्यतेच्या विषाने घेतले जाणारे बळी हे सारे या वर्णद्वेषी व्यवस्थेचेच परिणाम आहेत.

       सा-या जगातच अशा घटना सातत्याने घडत असतात. मग हिटलरचा माणुसकीला काळीमा फासणारा नाझीवाद असेल किवा दक्षिण आफ्रिकेत काळ्यांवर गो-यांकडून होणारा अन्याय असेल. नाओमीनं ज्या जॉर्ज फ्लॉइडच्या नावाची मुखपट्टी लावली होती, तो अमेरिकेसारख्या विकसित देशातला नागरिक होता. त्याच्या मानेवर गुडघा दाबून एका गो-या पोलिस अधिका-यानं त्याला मारलं. फ्लॉइड, मला श्वास घेता येत नाहीय; मला सोडा असं विव्हळून त्याला सांगत होता. तरी त्याचा काहीच परिणाम त्या पोलिसावर झाला नाही. फ्लॉइड मेला तरीही हा गुडघा दाबूनच होता. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या विकसित देशात फ्लॉइडचा असा बळी जाणं, ही गोष्ट काही लहान नाही. विकासया शब्दाचा खरा अर्थ काय, हा प्रश्नदेखील इथं डोकं वर काढतो. खरंतर, अमेरिका, ब्रिटन सारख्या पुढारलेल्या देशात अगदी लहानपणापासून वर्णद्वेष भिनवला जातोय. जेन इलियॉट या वर्णद्वेषाविरोधी जागरुकतेची मोहिम चालवणा-या गो-या शिक्षिका आपल्या भाषणात असं म्हणतात, की ‘‘अमेरिकी शिक्षण व्यवस्थेला कुठल्याही किमतीत श्वेतवर्णीयांच्या वर्चस्वाचं मिथकटिकवून ठेवण्यासाठी डिझाइन केलं गेलंय.‘‘ पण या डिझाइन पायी कित्येकांना ऑक्सिजन घेण्यास त्रास होतोय, त्याकडे मात्र मुद्दाम कानाडोळा केला जातोय. थोर समाजसुधारक, जगभरात मानवाधिकाराचं प्रतिक म्हणून ओळखले जाणारे आणि अमेरिकेतील समान नागरी अधिकार चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचीही हत्या वर्णद्वेषामुळेच करण्यात आली. या प्रथेविरोधी कित्येक आंदोलने झाली. नेल्सन मंडेला,‘ ‘महात्मा गांधीअशी अनेक नावं सांगता येतील. मनुष्य एका विशिष्ट जातीत जन्माला आला आहे, म्हणून तो अस्पृश्य असू शकतो असे खुद्द परमेश्वर जरी म्हणाला, तर मी त्याला परमेश्वर मानणार नाही; असे आपले टिळकही म्हणून गेलेत. फ्लॉइडच्या घटनेनंतर अमेरिकेत My skin is not a Weapon’ असे फलक हातात घेऊन निदर्शने झाली. त्याचं लोण हळूहळू जगभर पसरलं. पण या सा-याचा एकंदर परिणाम हवा तसा अजूनही दिसून आलेला नाही.

      नाओमी या सा-या द्वेषभावनेला मारलेली एक जबरदस्त चपराक आहे, असं मला वाटतं. सध्याचा विचार केला, तर जगभरातील कृष्णवर्णीय आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध करत आहेत. मग त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असतील किवा हल्लीच्या मन बुकर पुरस्काराच्या पहिल्यावहिल्या कृष्णवर्णीय विजेत्या बेर्नार्डिंग एव्हारिस्टो या ब्रिटिश लेखिका असतील. अनेक जागतिक पुरस्कारांवर कृष्णवर्णीय आपली छाप पाडत असल्याचे दिसते. खरंतर, डोळे आणि कातडीचा रंग ठरवणारं जे केमिकल किवा रंगद्रव्य असतं, ते सर्वांमध्ये सारखंच असतं. एखाद्याच्या शरीरात मेलनिन हे रंगद्रव्य किती प्रमाणात आहे, त्यावरुन त्याचा रंग ठरत असतो. पण रंगावरुन व्यक्तीची पारख करणं यात शहाणपण नाही आणि श्रेष्ठत्व तर बिलकुल नाही. हा वर्णद्वेष किती जोपासावा, गोंजारावा, वाढवावा आणि का? याचा विचार करायला हवा. एक वेळ त्या सा-या वर्णभेदाने पिडित असणा-या लोकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहायला हवं. जर आपल्यावर असा प्रसंग ओढवला, तर आपली काय गत होईल? हे तेव्हाच समजेल.

       हा वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद शेवटी विध्वंसाकडेच नेतो. हे एक कटू सत्य आहे, ज्याला हे जाणवतंय त्यानं ओसाका बनायला हवं. निव्वळ परिकथेच्या गोष्टी न करता जिथंकुठं बोलायला, व्यक्त व्हायला मिळतंय, तिथं अन्यायाला वाचा फोडायला हवी. न्यायासाठी झटायला हवं. तरच काहीतरी बदल होईल. नाहीतर या मुखपट्ट्या बांधून आपण तोंड तर झाकलंच आहे. बाकी हे असंच चालू राहिलं तर मुकं व्हायलाही वेळ लागणार नाही.                                      –  अतिथी-श्रेयस शिदे, ९४०४९१७८१४

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu