बॅ. नाथ पै सेवांगण मालवण ही संस्था गेली ४ दशके जनसेवाहीच ईश्वरसेवामानून विविध क्षेत्रात कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आरोग्य, कृषि व मच्छिमार आदींच्या उन्नतीसाठी अग्रेसर असलेली स्वयंसेवी संस्था! पूज्य साने गुरुजींचे विचार, साथी एस्.एम.जोशी यांचे आचार आणि समानतेचे संस्कार लाभलेली समाजवादी मातृसंस्था! लोकनेते बॅ.नाथ पै यांना अभिप्रत असलेले कार्य चिरंतन तेवत ठेवणारा, कोकणचाच कल्पवृक्षच जणू !

     गेले २१ दिवस मालवण – कुंभारमाठ येथील कोविड सेंटरला विनामूल्य माध्यान्ह भोजन सेवांगण पुरविते. ही योजना गरीब रुग्णांसाठी पूर्वी होतीच; पण आज कोरोना संग्राम वाढल्यामुळे संस्थेने आपले कार्य कोविड सेंटरपर्यंत विस्तारले आहे. याबाबत संस्थेची कार्यकारीणी, हितचिंतक, देणगीदार यांचे कौतुक आणि अभिनंदन!

      पण मला जास्त अप्रूप वाटते ते त्या संस्थेच्या श्रमिक कामगार वर्गाचे! जे हात ते अन्न तयार करतात, त्यांचे वाटप करतात, त्यांच्या तोंडी घास पोहोचवितात, बोलून रुग्णांचा ताण हलका करतात त्यांच खरेच कौतुक वाटतं हो! सर्व संस्थांमध्ये हा श्रमजीवी वर्ग असतो, तो ज्यावेळी असा मानवसेवेने पेटून उठतो त्यावेळी सर्व संकटांच्या शृंखला खळखळा तुटून पडतात! यावर्षीच बॅ.नाथ पै यांची जन्मशताब्दी! खरोखरच नाथ पै यांच्या काळजातील कार्याला जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला सुरुवातच झाली म्हणायची.

    याबाबत बॅ.नाथ पै यांच्या तोंडून ऐकलेली एक कथा मला आठवली ! बॅ.नाथ पै आपल्या भाषणात सुवचनांसोबत दुस-या महायुद्धाच्या कथा ही छान रंगवून सांगत! या कथांमधून ते मतदारांवर देशप्रम, समाजप्रेम बिंबवित. नाथ एकदा सभेत म्हणाले,‘‘मित्रांनो! दुस-या महायुद्धाच्यावेळी इंग्लंडला शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी अॅल्युमिनियमची मोठ्या प्रमाणात गरज भासली. देशातील सर्व गृहिणींना आवाहन करण्यात आले की, ‘‘सर्व महिलांनी त्यांच्याजवळील अॅल्युमिनियमच्या वस्तू देशाला अर्पण कराव्यात ! जुनी, फुटकी कोणतीही वस्तू असू दे ! आज देशाला त्याची गरज आहे ! Earlier you give, double you give  वस्तू जेवढ्या लवकर मिळतील तेवढेच देशासाठी त्याचे मोल दुप्पट!

     रेडिओवरील निवेदन ऐकून अॅल्युमिनियम गोळा करणा-या केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. एका म्हाता-या गरीब आजीबाईकडे देशाला देण्यासारखे काहीच नव्हते. तिने तिच्या जीर्ण घरातील मोडक्या दाराचे अॅल्युमिनियमचे हँडल देशाला अर्पण केले. त्यानंतर चार दिवसांनी रात्र झाल्यावर रोज त्या आजीबाई अंगणात आपली मोडकी खूर्ची टाकून आकाशाकडे नजर लावून निरखत! शेजारच्या गृहस्थांनी विचारले,‘‘आजीबाई रात्र झाली, थंडी पडली, झोपायचं नाही का?‘‘ यावर त्या आजीबाई सांगतात, ‘‘जरा थांबा! आता आमच्या लंडनवरून बर्लिनला आमची लढाऊ विमान मारा करायला जाणार आहेत. माझे हँडल ज्या विमानाला बसवलं आहे ते लढाऊ विमान मला पहायचं आहे.

            नाथ पै यांची कथा तेथे संपली असे क्षणभर मला वाटले. पण नाही, मित्रहो ती संपलेली नाही, ती आज ही सुरु आहे कुंभारमाठच्या कोविड केंद्रावर! त्या केंद्रातून मोठ्या प्रमाणात बरे होऊन घरी परतणा-या रुग्णांप्रती सेवांगणच्या कर्मचा-यांचा भाव तोच असणार! हे रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, कारण त्यांना जेवण देत असताना त्या रुग्णांच्या कानात कर्मचा-यांनी सांगितले असणार! हे आमचे अन्नदान नाही! हा आमच्या नाथ पै यांचा घास आहे! तुमच्यासाठी !

         नाथा घरचा घास जेवूनी ठणठणीत होणार! कोरोनातूनी बरे होवूनी लवकर घरी जाणार!

     आज कोरोनासोबत दुस-या लाटेचे हेही दुसरे महायुद्धच जणू! प्रत्येकजण यथाशक्ती यथामती आपले योगदान देत आहेत! नाथ पै सेवांगणच्या कर्मचा-यांचा ‘‘नाथांघरचा घास‘‘ हा त्यातीलच एक प्रकार! ब्रिटनच्या त्या अॅल्युमिनियम हँडलवाल्या आजीबाई सारखाच…

सुरेश ठाकूर, ९४२१२६३६६५

           

Leave a Reply

Close Menu