वेंगुर्ला शून्य कचरा संकल्पना आता सीबीएससी अभ्यासक्रमात

वेंगुर्ला नगरपरिषदेचा संपूर्ण जगभरात आदर्शवत ठरलेला व वेंगुर्ला नगरपरिषदेला राष्ट्रीय पातळीवर अव्वल ठरवण्यात कारणीभूत असलेला वेंगुर्ला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ प्रकल्पाचा समावेश शासनाने सी.बी.एस.ई अभ्यासक्रमात केला आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत शहरात राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचे धडे आता सहावीतील विद्यार्थी गिरवणार आहेत. त्यामुळे वेंगुर्ला शहराच्या नावलौकिकामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

      स्वच्छतेतून समृद्धीकडे असा बिजमंत्र घेऊन सुरू झालेल्या स्वच्छतेच्या चळवळीतून ‘माझा वेंगुर्ला.. स्वच्छ वेंगुर्ला.. सुंदर वेंगुर्ला’ हे घोषवाक्य राज्यात नाही तर देशपातळीवर पोहचले. इयत्ता सहावीच्या विज्ञान विषयात “कचरा-संघटन एवं निपटान” या धड्या अंतर्गत वेंगुर्ला शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाचा उल्लेख होणे हे सर्व वेंगुर्ला वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

      वेंगुर्ला नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वेंगुर्ल्यामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून शहरवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत बीज पेरले. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, कचरा डेपोचे रूपांतर स्वच्छ भारत पर्यटन केंद्र, प्लास्टिक मुक्ती, वसुंधरा बचावची जागृती या साऱ्या मोहीम राबवून सर्वांना यामध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी याचे सातत्य टिकवून ठेवले. म्हणूनच एक एक करत वेंगुर्ला नगर परिषदेने स्वच्छतेमधील जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यामधून मिळालेल्या बक्षीसरुपी निधीतून शहरातील अनेक विकासात्मक कामे पूर्णत्वास नेली.

      यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, नगरसेवक सर्व अधिकारी, कर्मचारी विशेष म्हणजे स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक या सर्र्वांचा समावेश आहे.

      देशपातळीपर्यंत सर्व स्तरातून गौरव झालेल्या वेंगुर्ला शहरातील या घनकचरा व्यवस्थापनाची दखल शासनाने घेतली असून सीबीएसईच्या इयत्ता सहावीच्या विज्ञान विषयात याबाबत धडा असणे हे वेंगुर्लेवासीयांसाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

Leave a Reply

Close Menu