देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांच्या मनात देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. शिरोड्यात महात्मा गांधी स्मारकासाठी १२ वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. आम्ही सुद्धा याबाबतीत एक पाऊल पुढे टाकून विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. याचा पाठपुरावा प्रशासन करत आहे. यामुळे लवकरात लवकर महात्मा गांधी यांचे स्मारक उभे करु अशी ग्वाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शिरोडा येथे दिली.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत शिरोडा यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह पदयात्रा व विविध कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. तनपुरे, राजेंद्र पराडकर, विनायक ठाकूर, तहसिलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे, आरवली सरपंच तातोबा कुडव, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, सदस्य कौशिक परब, विस्तार अधिकारी धुरी, गोसावी, पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, जयप्रकाश चमणकर, भाई मंत्री, ग्रा.पं.सदस्य रवी पेडणेकर, दिलीप गावडे, वेदिक शेटये, स्वरूपा गावडे, विशाखा परब, रोहिणी खोबरेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण, माजी सरपंच शुभांगी कासकर, राजन गावडे, विजय पडवळ, शिरोडा व्यापारी संघ अध्यक्ष राजन शिरोडकर, आरवली उपसरपंच रिमा मेस्त्री यांच्यासह महसूल विभाग, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत शिरोडा अधिकारी व कर्मचारी, महिला बचतगट, विद्यालये, आरोग्य विभाग कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिठाच्या सत्याग्रहावेळी ऐतिहासिक शिरोडा छावणीस भेट देऊन मुख्य ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात झाली. ही पदयात्रा शिरोडा बाजरपेठेत मार्गे ज्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला त्या गांधीनगर पर्यंत काढण्यात आली. यावेळी शिरोडा बाजारपेठ येथे शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा व चळवळीचा प्रसंग सादर करणारा चित्ररथ तसेच वाळू शिल्पकार रविराज चिपकर याने सादर केलेले वाळूशिल्प आकर्षक ठरले.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिरोडा गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा तसेच माजी सैनिक कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. यानंतर देशसेवेवर आधारित पथनाट्य, देशभक्तीपर गीत, नृत्य व लघुपट सादर करण्यात आले.