जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गचे अधिक्षक एन.पी.मठकर हे नियत वयोमानानुसार 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा जिल्हा व सत्र न्यायालयात सेवानिवृत्तपर सत्कार करण्यात आला.
श्री. मठकर यांनी त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास व त्यांनी गाठलेली उंची याबद्दल मनोगत व्यक्त करताना न्यायिक अधिकाऱ्यांसहित इतर कर्मचाऱ्यांना गहिवरुन आले. न्यायाधीश संजय भारुका यांनी श्री. मठकर यांच्या कामाबद्दल, त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचे कौतुक व त्यांच्या काम तत्परतेचा अनुभव सांगितला. आपल्या जगण्याने कोणाच्या तरी डोळ्यात अश्रु आलेत तर या जगण्याला अर्थ आहे नाहीतर मरण सुद्धा व्यर्थ आहे असे उद्गार त्यांनी काढत इतर कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यासारखेच काम करावे असे आवाहनही केले.
आपल्या 36 वर्षे 9 महिन्यांच्या कालावधीत कणकवली न्यायालयात सेवा बजावत असताना ग्राम न्यायालय वैभववाडी न्यायालयात 2015 ते 2020 पर्यंत सलग 12 वेळा ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. त्याबाबत न्यायालयाचा आपण खूप खूप आभारी आहे. अत्यंत गरीब परिस्थितून दि.1 मार्च 1986 रोजी सावंतवाडी येथून न्यायालयीन सेवेला सुरुवात केली आणि अधिक्षक या अत्यंत जबाबदार पदावरुन मी निवृत्त होत आहे. या सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचा मी ऋणी असल्याचे एन.पी.मठकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग दिवाणी न्यायाधीश श्रीमती कुरणे, सिंधुदुर्ग मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दिपक म्हालटकर, प्रबंधक चारुता दळवी, सावंत, कोर्ट मॅनेजर माळकर, सुकांत सावंत, अधिक्षक व्ही.डी.कदम, लिपिक कारेकर, सना नाईक, लघुलेखक परुळेकर, पिटिशन राईटर मधुकर सावंत, एन. पी. मठकर यांचे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत मठकर, पार्वती मठकर, वसंत मठकर, वर्षा मठकर, नाजुका मठकर, विशाल मठकर, साईप्रभा मठकर, साईराज मठकर, श्री. नेरुरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कनिष्ठ लिपिक रंजना परब यांनी मानले.