नाट्य क्षेत्रात ठसा उमटविणा-या महिलांचा वेंगुर्ल्यात सत्कार   


       वेंगुर्ला येथे संपन्न होणा-या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या महिला कलाकारांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे.  या सत्कारांमध्ये उषा परब (सावंतवाडी), कल्पना बांदेकर (सावंतवाडी), गीताली मातोंडकर (वेंगुर्ला), वर्षा वैद्य (कुडाळ), शुभदा टिकम (मालवण), तृप्ती राऊळ (कणकवली) महिला कलाकारांचा समावेश आहे.

      उषा परब यांनी रंगभूमीची सेवा करण्याबरोबरच साहित्यसेवाही केली आहे. कादंबरी, ललितसंग्रह आणि काव्यसंग्राहबरोबरच नाटक, एकांकिका संग्रह आणि बालसाहित्याची निर्मिती केली आहे. कल्पना बांदेकर या गेली ३० वर्षे सातत्याने रंगभूमीची सेवा करीत असून राज्यनाट्य, एकांकिकेबरोबरच ७ लघुपटांमध्ये आणि ५ सिनेमातही काम केले आहे. धूमशानया मालवणी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. बांदेकर या सध्या झी मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या नवा गडी-नवा राज्यया मालिकेमध्ये काम करीत आहे. वर्षा वैद्य या अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन, निवेदन, गायन, नृत्य दिग्दर्शन यामध्येही आपला ठसा उमटवित आहेत. वयाच्या १७व्या वर्षी स्वामीकार कै.रणजित देसाई यांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कारही झाला होता. मिताली मातोंडकर या गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन व एड्स जनजागृतीसाठी जिल्ह्यात त्यांनी अनेक ठिकाणी पथनाट्येही सादर केली आहेत. गेल्या १२ वर्षात त्यांनी अनेक नाटकांमधून प्रमुख भुमिका साकारताना उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिकेही पटकाविली आहेत. हजाराहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. जागृती बालकलामंचासाठी त्या नृत्य प्रशिक्षक म्हणूनही काम करीत आहे. सन २००६-०७ पासून नाट्य क्षेत्रात आलेल्या शुभदा टीकम यांनी सुमारे १३ एकांकिकेमध्ये काम केले आहे. त्यातील सायलेंटस्क्रिम या एकांकिकेच्या ३० हून जास्त प्रयोगांमध्ये त्यांनी स्त्री अभिनयाचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. स्कीट लेखन करण्याबरोबरच डान्स ग्रुपही चालवत आहे. राज्यनाट्य स्पर्धेतील बझरया नाटकातून त्यांना रौप्य पदकही मिळाले आहे. तृप्ती राऊळ या उदयोन्मुख कलाकार असून महाविद्यालात युथ फेस्टीव्हलमधून नृत्य, नाटक, स्कीट यामध्ये त्यांचा सहभाग असायचा. सन २०२०, २०२१ आणि २०२२मध्ये राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेतून उत्कृष्ट स्त्री अभिनयाची पारितोषिके पटकाविली आहेत.

      या सर्वांचा सत्कार ७ जानेवारी रोजी सकाळी कलावलय आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Close Menu