डॉक्टर सदानंद मोरे यांच्या द्विखंडात्मक ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथातील एका प्रकरणाचे नाव इतिहासातलं ‘हरवलेलं पान’ असे आहे. त्यात अनेक लोकांनी जे प्रचंड काम करून ठेवलेले आहे, परंतु आपल्याकडील इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. त्यांची जी माहिती उपलब्ध होऊ शकली ती लिहिण्याचा प्रयत्न झाला आहे. वर्तमान हा इतिहासजमा होताना तो एकांगी होऊ नये, त्याचा सर्वसमावेशक विचार असायला हवा याची काळजी आपण सर्र्वांनीच घेतली पाहिजे. अन्यथा इतिहासाची अनेक पाने अशीच काळाच्या पडद्याआड जातील. हे असे होऊ नये यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेने एक अभ्ािनव उपक्रम हाती घेतला आहे.
वेंगुर्ला शहर हे ऐतिहासिक शहर आहेच. त्याचबरोबर इथून लेखक, कलाकार, विचारवंत, खेळाडू घडविले आहेत. याचा इतिहास साक्षीदार आहे. पण तरीही ती जीवनशैली माणूस घडविणारी होती. आताच्या पिढीला एकही पैसा खर्च न करता खेळता येणारे त्यावेळचे खेळ म्हटले तर विशेष वाटते.
ही सर्व माणसे या वेंगुर्ल्यात लहानाची मोठी होत असताना दशावतार लोककला, गाव रहाटीचा शिमगा (रोम्बाट) यांच्यासोबत जीवन अनुभवत स्वतःला समृद्ध केले. ही जीवनशैली शहर सुुशोभिकरणासाठी करताना नवीन पिढीला, पर्यटकांना वेंगुर्ल्याची माहिती शहरात फिरताना मिळावी तसेच वेंगुर्ल्याच्या सांस्कृतिक, सामाजिक वैभवाची कल्पना यावी यासाठी भित्तीचित्रे नगरपरिषदेतर्फे रंगविण्यात आली आहेत.
या भित्ती चित्रांमध्ये केवळ स्वच्छतेचे संदेश लिहून न थांबता या संदेशा बरोबरच चित्राला अनुसरून संदेश देण्याचा प्रयत्न आहे. उदा. खेळाच्या भिंतीवर ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि सुदृढ वेंगुर्ला’, काजू उद्योगाचा इतिहास भिंतीवर मांडताना ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि वैभवशाली वेंगुर्ला’, दशावताराच्या चित्राच्या खाली ‘स्वच्छ वेंगुर्ला, सुंदर वेंगुर्ला आणि सांस्कृतिक वेंगुर्ला’, शाळेच्या भिंतीवर ‘स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला आणि साक्षर वेंगुर्ला’ असे जाणीव पूर्वक लिहिले आहे. स्वच्छतेची सवय तर सर्व नागरिकांना आहेच त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी शहराचे सौंदर्यीकरण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. या सर्वच विचार करून ही भित्तीचित्रे रेखाटण्याचे काम चालू आहे. ही संकल्पना वेंगुर्ल्याचे स्वच्छता दूत श्री. सुनील नांदोस्कर यांनी मुख्याधिकारी श्री. परितोष कंकाळ याजकडे बोलून दाखविली आणि ती मुख्याधिकारी यांनी तात्काळ अंमलात आणली आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. आमच्या आठवणी भित्तीचित्राच्या माध्यमातून बोलू लागल्या असल्याचे समाधान अनेक वेंगुर्लेवासीय व्यक्त करत आहेत.
