राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळींची ‘वाल्मिकी’ प्रथम

वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळी, पिंगुळी यांच्या ‘वाल्मिकी’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख 10 हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

      बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत, कलावलय आयोजितस्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 7 व 8 जानेवारी रोजी  येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेत विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांच्या ‘चफी’ या एकांकिकेने द्वितीय, कलासक्त मुंबईच्या ‘ओल्या भिंती’ एकांकिकेने तृतीय तर वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवलीच्या ‘स्वगत स्वगते’ या एकांकिकेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे 7 हजार, 5 हजार व 2 हजार तसेच कायमस्वरुपी चषक देण्यात आले.  वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शन प्रथम- शंतनू पाटील (चफी), द्वितीय- तेजस म्हसके व विठ्ठल तळवलकर (वाल्मिकी), तृतीय-योगेश कदम (ओल्या भिंती) यांनी पटकाविला. पुरुष अभिनय- प्रथम-रमेश घाडी (वाल्मिकी), द्वितीय-यश शिंदे (चफी), तृतीय-योगेश जळवी (मधुमाया) यांनी पटकाविला. स्त्री अभिनय- प्रथम- श्रद्धा परब (वाल्मिकी), द्वितीय- मंगल राणे (स्वगत स्वगते), तृतीय- धनश्री गाडगीळ (आधे-अधुरे) यांनी पटकाविला. नेपथ्य- प्रथम- सुशांत तांबे (लाडाची लेक)-  प्रकाश योजना- शाम चव्हाण (ओल्या भिंती), पार्श्वसंगीत-कलमेश मेस्त्री, मिहिर मेस्त्री, ओंकार म्हसके (वाल्मिकी) यांना गौरविण्यात आले.

      बक्षिस वितरण प्रसंगी परीक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलकर्णी, कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, खजिनदार सुनिल रेडकर दिगंबर नाईक, राजन गिरप यांच्यासह पी. के. कुबल, प्रशांत आपटे, प्रविण सातार्डेकर, विनोद वरसकर, सुनिल डुबळे, दिनेश तानावडे, विनायक जोशी, जितेंद्र वजराटकर, विक्रांत आजगावकर, मयुर वेंगुर्लेकर, पंकज शिरसाट, बापू वेंगुर्लेकर, चतुर पार्सेकर, सेजल भाटकर, सीमा मराठे उपस्थित होते. सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.

      परीक्षक ज्ञानेश मुळे व रवीदर्शन कुलकर्णी यांनी बऱ्याच ठिकाणी एकांकिका सादरीकरणात मालिकांचा प्रभाव जाणवतो. तांत्रिक गिमिक्सचा वापर करुन इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे नाट्य हरवून जाते.  तो एक प्रचारकी माहितीपट अगर तंत्रस्नेही सादरीकर होते. मात्र वेंगुर्ल्याच्या स्पर्धेत असे काही झाले नाही. काही अपवाद वगळता कसदार संहितांचे स्पर्धक संघांनी चांगल्या प्रकारे सादरीकरण केले. ही परंपरा अशीच अविरत सुरु रहावी अशा शुभेच्छा परीक्षकांनी दिल्या.

Leave a Reply

Close Menu