मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणेबाबत वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे शासनाचे वेंगुर्ला तालुक्याचे प्रतिनिधी असलेले तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज यांनी निवेदन सादर केले.
या निवेदनात, मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल महामार्गाचे काम याचा निषेध करण्यासाठी रायगडमधील पत्रकार ५ ऑगस्ट रोजी बोंबाबोंब आंदोलन करीत आहेत. या आंदोलनास महाराष्ट्र पत्रकार परिषदेचा पूर्ण पाठींबा असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांनीही पाठींबा दर्शविला आहे.
कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी रखडलेल्या या मुंबई-गोवा महामार्गांचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने कोकणवासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नी प्राधान्याने लक्ष देऊन एक तप रखडलेल्या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आम्ही वेंगुर्ला तालुका पत्रकार संघ हे निवेदन देऊन रायगडमधील पत्रकारांच्या आंदोलनास सुद्धा जाहीर पाठींबा दर्शवत आहोत. तरी आमच्या रखडलेल्या रस्ता कामाबाबत असलेल्या तीव्र भावना राज्यसरकारकडे पोहोचवून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण होण्यास विनंती आहे असे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, कार्यकारणी सदस्य दीपेश परब, तालुका पत्रकार संघाचे सदस्य प्रदीप सावंत, के.जी.गावडे, भरत सातोस्कर, सीमा मराठे, विनायक वारंग, अजय गडेकर, प्रथमेश गुरव आदींचा समावेश होता.