शिरोडा येथील ताज प्रकल्पासंदर्भात जमिन मोजणी प्रश्नी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिक ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार ओंकार ओतारी, माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, लिगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विजय पडवळ, सेक्रेटरी श्रीकृष्ण पडवळ, हॉटेल व्यावसायीक जगन्नाथ डोंगरे आदी उपस्थित होते.
ताज प्रकल्प सुरू होण्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. मोजणी करणे हा शासनाचा भाग आहे. काही किरकोळ मोजणी शिल्लक आहे, ती झाल्याशिवाय मुख्य समस्या लक्षात येणार नाही, काही लोकांचे घराचे कोपरे, देवस्थान हे संपादित जागेत गेलेले आहेत. ते सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचे कारण नाही. काही लोक याला दिरंगाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प झाल्यानंतर शिरोडा हे आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. भूसंपादन झालेले असताना त्या कंपनीने पुन्हा पैसे देण्याचे मान्य केले आहे. मोजणी न झाल्याने ते पैसे जमिनदारांच्या खात्यात यायला उशिर होत आहे. नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे गणपती गेला, दिवाळी गेली जमिन मोजणी पुढे गेली. मात्र, खूप उशिरापर्यंत ही मोजणी ठेवता येणार नसल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.
यावेळी जयप्रकाश चमणकर यांनी भूमिपूत्रांची बाजू मांडताना सांगितले की, अत्यंत गरीब असलेल्या भूमिपूत्रांची त्यांच्या संमतीविना सक्तीने जमिन घेण्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करून अवघ्या २०० रूपये गुंठा या दराने ३०० शेतकयांची जमिन घेताना निदान त्यांचे घरेदारे, बागायती, शौचालय, शेती क्षेत्र वगळावी, अशी मागणी केली. ताजसारखा चांगला पर्यटन प्रकल्प येथे येत असल्याने त्यांच्या मागणीनुसार ६० एकर जमिन दिली. मात्र, त्यानंतर सक्तीने जमिन घेण्याचा प्रकार झाला. आज ताजच्या ताब्यात १२० एकर क्षेत्र आहे. त्यामुळे घरभाट क्षेत्रातील ९ हेक्टर जमिन सोडण्यात यावी, असेही सांगितले.