नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील गटारे व व्हाळी साफसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवणा-या आपत्ती निवारणासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.
शहरातील बंदर रोड, दाभोसवाडा, गावडेवाडी, गिरपवाडा, जुना स्टॅण्ड, जुनी पोलिस लाईन, भुजनाकवाडी, कलानगर, दाभोली नाका ते बस स्टॅण्ड या भागातील गटारे व व्हाळी साफसफाईचे काम पूर्ण झालेले असून मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारे, विठ्ठलवाडी, दाभोसवाडा, राजवाडा, गावडेवाडी, कलानगर, नातू व्हाळी, पोकळे गल्ली, गाडीअड्डा, होळकर गल्ली व आनंदवाडी या ठिकाणचे गटारे तसेच व्हाळी साफ करण्याचे काम सुरू आहे. साफसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, वेंगुर्ला शहरातील ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्या मिळकतधारकांना नगरपरिषदेने नोटीसा बजाविलेल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करून तशी माहिती नगरपरिषदेस देण्यात यावी. रस्त्याने जाणा-या येणा-या नागरिकांचे जीवितास कोणताही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत संबंधित नागरिकांनी वेळीच दक्षता न घेतल्यास कोणतीही वित्तीय, जीवितहानी झाल्यास त्यास नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शहरातील रहदारीच्या ठिकाणी व रस्त्यांलगत सार्वजनिक मालकीच्या जागेमध्ये किवा वैयक्तिक मालकीच्या जागेमध्ये जी धोकादायक झाडे असतील, ती झाडे महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये नगरपरिषद कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन संबंधितांना तोडून घ्यावीत अन्यथा अशा धोकादायक झाडांमुळे किवा झाड्यांच्या फांद्यांमुळे कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित जागा मालक आणि झाड मालक जबाबदार राहतील. यामुळे होणा-या दुर्घटनेस वेंगुर्ला नगरपरिषद जबाबदार राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घ्यावी अशा सूचना नगरपरिषद प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.