कर्नाटकातील सागरकिनाऱ्यावरील यक्षगान मराठी भाषेत

      सप्तरंगाच्या रंगसंगतीने साधलेली रंगभूषा, लक्षवेधक वेशभूषा, तालबद्ध पदन्यासातून साकारलेल्या नृत्यमय हालचाली, सुरेल शास्त्रोक्त सुरावटीतील कानडी बाजातील मराठी पद्यरचना, उत्स्फूर्त संवाद व प्रभावी मुद्राभिनय याचा सुरेख मेळ साधत महाभारतातील अभिमन्यूच्या जीवनावरील ‘चक्रव्यूह’ या कथानकावर आधारित यक्षगानाने सावंतवाडी, वेंगुर्ले व आंदुर्ले गावातीतील रसिकांना मंत्रमुग्ध केले. दशावताराप्रमाणेच यक्षगान स्वतंत्र कला व संस्कृतीचे दर्शन घडवित लोकरंजन व लोकप्रबोधनाचे कार्य निर्भेळपणे करत आहे. या दोन्ही लोककला स्वतंत्र आहेत याचीही अनुभूती जिज्ञासू रसिकांनी ‘याचि देही याचि डोळा’ घेतली.

      कर्नाटक राज्यातील समुद्र किनारपट्टीतील प्रातांत यक्षगान नावाची लोककला प्रसिद्ध आहे. या कलेचे दशावताराशी साधर्म्य आहे. पण त्याचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र शैली व स्वतंत्र बाजही आहे. यक्षगान अभिनय, वेशभूषा, रंगभूषा, विशिष्ट प्रकारचे संगीत व तालबद्ध पदन्यासाचे दर्शन घडविते. यक्षगान कानडी भाषेत सादर होत असल्याने अन्य भाषिक रसिकांना त्याचा आनंद घेता येत नाही. उच्चकोटीचा आनंद देणाऱ्या या यक्षगानाचा मराठी खेळ साकारण्याची कल्पना सावंतवाडी येथील निवृत प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर यांनी प्रत्यक्षात आणली. उडुपी येथील यक्षसंजीव यक्षगान केंद्राचे सर्वेसर्वा गुरू संजीव सुवर्णा यांची यासाठी मोलाची साथ फातर्पेकर यांना मिळाली.

      गेले तीन महिने यक्षगान मराठी खेळाच्या तालमी उडुपी येथे सुरू होत्या. पंजाबी, कानडी, मल्याळी कलाकारांना सोबत घेऊन मराठीबाबत काहीच माहिती नसणाऱ्या कलाकारांकडून हा खेळ करून घेण्यात आला. मूळ यक्षगानचे मराठी भाषांतर, पदांचे मराठीकरण यासाठी
फातर्पेकर सरांनी मेहनत घेतली. शब्दांचे उच्चार, संवादफेक, आवाजातील चढउताराच्या लकबी शिकविण्यासाठी त्यांनी सहावेळा उडुपीची वारी केली. संजीव सुवर्णा यांनी हा खेळ परिपूर्ण करण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले. त्यामुळेच दशावताराशी नाळ जोडलेल्या रसिकांना यक्षगानचा सर्वांगसुंदर खेळ अनुभवण्याची संधी प्राप्त झाली.

      मराठी यक्षगानचा पहिला वहिला खेळ सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात राजेसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रा. विजयकुमार फातर्पेकर लिखित ’दशावतार : कला व अभ्यास’ या पुस्तकाचे प्रकाशन राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले, गुरू संजीव सुवर्णा, पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे यांच्या उपस्थितीत झाले. अनेक जिज्ञासूंनी या खेळाला उपस्थित राहून या रांगड्या कलाकृतीचा आनंद लुटला. कर्नाटकातील सागर किनारपट्ट्‌यावरील प्रदेशात प्रचलित असणारा यक्षगान सुमारे साडेचारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे किंबहुना त्याही आधीपासूनचे असावे असा दावा संशोधकांकडून केला गेला आहे. त्यामुळे दशावतारातून यक्षगानचा उगम याबाबत कोणतेच ठोकताळे ठोकणे चुकीचे ठरेल. त्यामुळे या दोन्ही लोककला स्वतंत्र आहेत याचीही अनुभूती रसिकांना हा खेळ पाहिल्यानंतर आली.

      मराठी यक्षगानचा दुसरा खेळ वेंगुर्ल्यातील मधुसुदन कालेलकर नाट्यगृहात नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार कंपनीचे संचालक तुषार नाईक व त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने यशस्वी झाला. वेंगुर्ल्यातील अनेक कला रसिकांनी या खेळाला उपस्थिती दर्शवून कानडी कलाकरांच्या मराठी आविष्काराला भरभरून दाद दिली. मराठी भूमीतील यक्षगानचा पहिला खेळ 1986 साली कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावी झाला होता. त्याकाळी कर्नाटकात यक्षगान सादर करणाऱ्या मूळ कुडाळदेशकर मंडळींची कुलदेवता आंदुर्ल्यातील चांमुडेश्वरी देवी असल्याने देवीच्या चरणी आपल्या कलेची सेवा अर्पण करण्याच्या उद्देशाने या मंडळींनी हा खेळ तेव्हा सादर केला होता. हाच धागा पकडत मराठी यक्षगानचा तिसरा खेळ याच मंदिरातील प्रांगणात करण्यात आला. त्यालाही रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

      महाभारत तथा विविध पुराणांतर्गत कथानकांवर आधारित आख्याने सादर करण्याकडे यक्षगानाची भिस्त असते. गायनाला साथ असते ती टाळ, मंडुले (मृदंगासारखे परंतु आकाराने लहान असे तालवाद्य), चंडे (हे देखील तालवाद्य) आणि श्रुती (हार्मोनियम) या वाद्यांची. काही पात्रांचा रंगमंचावर होणारा प्रवेश, युद्धाचे प्रसंग, तीव्र संघर्ष, राग, क्रौर्य, शौर्य अशासारख्या गोष्टी अधिक परिणामकारक रंगस्थळी दिसाव्यात यासाठी चंडे विशिष्ट लकबीने व खुबीने वाजविले जाते. यक्षगान कलाकारांच्या समूहाचा भागवत हा मुख्य सूत्रधार! भागवत हातातील टाळ तालबद्धिरत्या वाजवत गात असतो. त्यामुळे कथानकाला गती प्राप्त होत जाते. हिंदुस्थानी तथा कर्नाटकी संगीतातील जवळपास एकशेदहा विविध रागांवर आधारित असे हे संगीत यक्षगानात वाजविले जाते. महाभारतातील चक्रव्यूह, द्रोणपर्व, कर्णार्जुनयुध्द, कीचकवध, सुभद्राविवाह, विराटपर्व, द्रौपदी स्वयंवर ही कथानके सादर करण्याकडे यक्षगानाचा विशेष ओढा! मराठी यक्षगानासाठी चक्रव्यूह हे कथानक निवडण्यात आले होते.

      उच्चविद्याविभूषित कलाकारांचा रांगडा मेळ भाषा, प्रांत, पंथ, धर्म, भौगोलिक सीमा या सर्वांच्याही पलिकडे जात अंत:करणाचा ठाव घेणारी ही लोककला मराठी अनुवादामुळे तळकोकणातील कला रसिकांना समरसून पाहता आली. उडुपी येथील ’यक्ष संजीव यक्षगान केेंद्रा’चे प्रशिक्षणार्थी असलेले सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, पीएचडी अभ्यासक, प्रोफेसर, विद्यार्थी यांनी या खेळात सहभाग घेतला. आद्या(अभिमन्यू), पल्लवी (दुर्योधन), प्राजंश्री(कृष्ण), सौम्या (अर्जुन), कवना (कर्ण), अंजली (शल्य), श्रुथी (सुभद्रा), वेनीश्री व वेदा या पडदाधारी अशी महत्त्वाची पात्रे महिला कलाकारांनी तेवढ्याच ताकदीने सादर करून यक्षगानमध्ये रंगत आणली. तर अभिनव (द्रोणाचार्य), प्रशांत (संशप्तक/राक्षस), अमृत (सारथी), शिशिर व शंतनु (सैनिक), मिथून व पांडुरंग रंगभूषाकार, कार्तेिक (भागवत/ गायक), रत्नाकर (मडुलेवादक), गुरू संजीव सुवर्णा (चंडेवादक)असा त्यांचा संच होता.

      यक्षगानचा तळकोकणातील पहिला वहिला मराठी खेळ येथील रसिकांना व उच्चकोटीचा आनंद देणारा ठरला. प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी तिन्ही ठिकाणी यक्षगान प्रयोगाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल रसिकांसोबत सावंतवाडी आयोजक लोककला अध्ययन केंद्र, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, वेंगुर्ला आयोजक  तुषार नाईक, नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार लोकनाट्यमंडळ, मोचेमाड, तर आंदुर्ले आयोजक श्री देवी चामुंडेश्वरी सेवा समिती, मुंबई, व श्री देवी चामुंडेश्वरी देवस्थान उपसमिती, आंदुर्ले यांचे तसेच इथे आल्यानंतर कलाकारांची विविध ठिकाणी जाण्यायेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था स्वयंस्फूर्तीने करणारे तुळस  येथील  झांट्ये कॅश्‍यू ॲग्रोचे श्रेयस झांट्ये यांचेही आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचे निवेदन सीमा मराठे व महेंद्र मातोंडकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu