महिला बचतगटातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे व इतर गटातील उत्पादन मालाची विक्री करुन उत्पन्न वाढवणे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदमध्ये उद्योजक महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.
दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या बचतगटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद व टिम फांउडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 17 मे रोजी स्वामी विवेकानंद सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवीली.
कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी वेंगुर्ला नगरपरिषदचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी महिलांना मार्गदर्शन करताना टिम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जे व्यासपीठ मिळालेले आहे ते बचतगटाच्या उत्पादने विक्री करण्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत. यातून मार्केटिंगचा प्रश्न सुटला तर आर्थिक उन्नती होवून खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण होणार आहे. त्याचबरोबर बचतगटांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपरिषद त्यांच्या पाठीसी नेहमी उभी राहील असे आश्वासन दिले.
जे गट उत्पादन करतात त्यांच्या उत्पादनांची पडताळणी व उत्पादने कमीशन बेसीसवर विक्री करण्यास ज्या महिला उत्सुक आहेत त्यांची नोंदणी करण्यात आली व त्या विषयी सविस्तर माहिती टिम फाउंडेशनचे आय टी सेल चे प्रमुख श्री. चंद्रशेखर देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाला व्यासपीठावर श्री. परितोष कंकाळ मुख्याधिकारी, श्री. थोरात परिविक्षाधिन मुख्याधिकारी, श्रीम. संगिता कुबल प्रशासकीय अधिकारी, टिम फाउंडेशनचे श्री. चंद्रशेखर देशमुख, श्री. सचिन मारे, श्री. दीपू टांक, श्री. एकनाथ पाटील व्यवस्थापक एन यु एल एम सावंतवाडी, श्री. विलास ठुंबरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार श्रीम. ऐश्वर्या सावंत व्यवस्थापक यांनी मानले.