सिंधुदुर्ग जिल्हा सम्यक साहित्य संसद संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार देण्यात आले. यात आ.सो.शेवरे स्मृतीप्रित्यर्थचा जीवन गौरव पुरस्कार ज्यांनी दलित कवितेतील हिदुत्व, मूल्य शोध, देशीवाद-रुप आणि रंग सारखे आठ साहित्य समिक्षा ग्रंथ तसेच ‘धम्म चळवळ स्थिती आणि गती‘ अशासारखे आठ वैचारिक लेखन आणि चार कवितासंग्रह लिहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व समिक्षक मोतीराम कटारे यांना तर उत्तम पवार स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या ‘सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने‘ या काव्यसंग्रहाला देण्यात आला आहे. हा कार्यक्रम कणकवली येथे पार पडला. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अनुक्रमे दहा हजार आणि पाच हजार असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव, भारतीय जनता मासिक संपादक प्रसेनजित, ज्येष्ठ कवी डॉ.अनिल कांबळी, पुरस्कार प्रायोजक प्रकाश तांबे, इंजि.अनिल तांबे, किशोर देऊ कदम आदी उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी प्रास्ताविक केले, स्वागत आणि परिचय मधुकर मातोंडकर, पुरस्कारप्राप्त मानवंतांच्या मानपत्राचे वाचन रूपाली कदम यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री सुचिता गायकवाड-कदम तर आभार कार्यवाह राजेश कदम यांनी मानले.