सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनांमध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खा.नारायण राणे, आमदार वैभव नाईक, नितेश राणे व जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅटींगसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून एकूण ४७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर २० लाख २८ हजार ६१५ रुपये खर्च करून पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. यामुळे पत्रकार भवनातील या सोलर पॅनलमुळे वीज बिल मुक्ती मिळून व्यवस्थापन खर्च कमी होणार असल्याची माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली. दरम्यान, याच इमारतीमध्ये ६ टॉवर एसी मंजूर करण्यात आले असून त्यासाठी ९ लाख ४० हजार ९१८ रुपये निधी देण्यात आला आहे. तर या इमारतीमध्ये कॅन्टीन उभारण्यासाठी १८ लाखांचा निधी देण्यात आला असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळणार आहे. जिल्हा नियोजन अधिकारी श्री.बुधावळे, श्री.पवार व बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही चांगले सहकार्य मिळाले असून जिल्हा नियोजनमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रविद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने  जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu