प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांनी तुळस येथील श्री जैतिर उत्सवामध्ये सहभागी होत जैतिर देवाचे दर्शन घेतले आणि या वार्षिक उत्सवाचा आनंद लुटला.
श्री जैतिर हा माझा माहेरचा देव आहे. पूर्ण वर्ष आम्ही या जैतिर उत्सवाची आणि गणेत्सवाची वाट पहात असतो. मीच नाही तर तुळस गावातील प्रत्येक माहेरवाशीण अशी संधी कधीच सोडत नाही. कितीही चित्रीकरणाच्या कामात व्यस्त असले तरी त्यातून वेळ काढून मी एक दिवस तरी या उत्सवाला हजेरी लावतेच. समजा एखादे वर्षी यायला नाही मिळाले तर खुपच वाईट वाटते. वर्षातून एकदा तरी देवासाठी यायलाच हवं. देवाच बोलावण असेल तर नक्कीच येणं होतं. यावर्षी शेड्युल्ड बिझी नसल्यामुळे मी याठिकाणी दोन-चार दिवस राहत आलं, ही एक आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पा तुळसकर यांनी दै. लोकमतशी बोलताना दिली.
जैतिर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात शुक्रवारी दिपोत्सव आयोजित केला होता. या दिपोत्सवातही शिल्पा तुळसकर यांनी सहभागी होत दिप प्रज्वलित केले. तर उत्सवाच्या सांगते दिवशी म्हणजेच कवळासादिवशी बराच वेळ भाविकांप्रमाणेच गर्दीत उभे राहून उत्सवाचा आनंद लुटला. ब-याच भाविकांनी शिल्पा तुळसकर यांच्यासोबत फोटोही काढले.