दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने १६ जून रोजी वेंगुर्ला तालुक्यातील दहावी व बारावी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा येथील स्वामिनी मंडपम् येथे पार पडला. विद्यार्थ्यांना दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आकर्षक भेटवस्तू व वालावलकर महा ई – सेवा केंद्राच्या संचालिका समीक्षा वालावलकर यांच्यातर्फे स्कूल बॅग देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, उद्योजक सुभाष कुबल, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, जेष्ठ मार्गदर्शक महेश सामंत, कोचरा सरपंच योगेश तेली, डॉ.आर.एम.परब, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, उपतालुकाप्रमुख सचिन नार्वेकर, खानोली उपसरपंच सचिन परब आदी उपस्थित होते.
भविष्यात आपल्याला सक्षमपणे उभे राहायचे असेल तर आपली हुशारी व शिक्षण महत्वाचे आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पक्षभेद बाजूला ठेवून सातत्याने निःस्वार्थी काम करत आहेत. ते सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्या संकल्पना आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्न करत आहोत. भविष्यात सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना आल्यास ती मंडळाच्यावतीने निश्चित दूर करण्यात येईल असे सचिन वालावलकर म्हणाले. उद्योजक सुभाष कुबल यांनी आपला रिक्षाचालक, भाजीविक्रेता ते उद्योजक बनण्याचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.
दीपक केसरकर यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, शिक्षण कसे सोपे होईल याबाबत अभ्यास करून, फार बारकाईने विचार करून वाटचाल केली असल्याचे उमेश येरम यांनी सांगितले. शिक्षकांचाही विद्यार्थी घडविण्यात मोठा वाटा असल्याचे जेष्ठ मार्गदर्शक महेश सामंत यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.