आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा

          ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील, त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा प्रश्‍न आहे. येणाऱ्या पिढीसाठी पुढील सर्व निवडणुका जिकंणे आपल्यासाठी अनिवार्य ठरणार आहे. कारण ही लढाई आता आपल्या अस्तित्वाची बनली आहे. लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी सज्ज व्हा. पुढील निवडणुकांमध्येही पैशाचा महापूर येईल, डळमळून जाऊ नका, धैर्याने आणि हुशारीने परिस्थितीला सामोरे जा. आपला मतदार प्रामाणिक आहे, त्यांना विश्‍वासात घ्या, असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ल्यातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत केले.

      लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच इंडिया आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असलेले माजी खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले तालुक्याला भेट देत इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे-परब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी नेत्या जानवी सावंत, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाद, तालुका प्रमुख पंकज शिरसाट, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश निकम, प्रकाश गडेकर, सेनेच्या महिला आघाडीच्या सुमन निकम, सुकन्या नरसुले, अस्मिता राऊळ, निर्भय बनो अभियानचे पदाधिकारी ॲड. किशोर वरक यासह इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.

      राऊत म्हणाले, येणारा काळ मोठा कठीण आहे. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला हे सत्य आहे, पण पराभवाने मी खचलेलो नाही. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी जीव तोडून प्रामाणिकपणे काम केले. म्हणूनच मते विकत न घेता 4 लाख मतदारांचा आपल्याला आशीर्वाद लाभला. पुढील निवडणुका आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्राने भरभरून साथ दिली. पैशाचा महापूर दूर सारून राज्यात नंबरएकचे मताधिक्य दिले. हाच उत्साह पदाधिकाऱ्यांनी साजरा करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

      फक्त आता जास्त जागृत होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ठाकरे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी वेंगुर्ले तालुक्यात झालेल्या मतदानाचा अभ्यास बारकाईने करावा, प्रत्येक मतदारसंघाचा चिकित्सक पद्धतीने आढावा घेण्याची गरज आहे. विरोधक बदमाश आहेत. पुढील काळात ते आपल्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आखतील. त्यांच्या कुटनितीना बळी पडू नका, इंडिया आघाडीतील कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे संशयाने पाहू नका. असेही विनायक राऊत म्हणाले. माजी मंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सेनेच्या उपनेत्या जानवी सावंत व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय नेत्या अर्चना घारे-परब यांनीही यावेळी विचार मांडले. आभार योगेश कुबल यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu