वेंगुर्ला तालुका क्रीडा संकुल येथे नव्याने क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता मल्टी प्ले फिल्ड हॉलची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. या कामासाठी सुमारे ३ कोटी ६५ लाख ९९ हजाराच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी बंदर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून बंदर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सदर कामाला मंजूरी देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील हा एकमेव प्ले फिल्ड हॉल असून यामुळे पुढील काळात याठिकाणी विविध इनडोअर क्रीडा प्रकारांना चालना दिली जाणार आहे. विशेष म्हणजे व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांना या हॉलचा उत्तम उपयोग होणार आहे. या कामामुळे वेंगुर्ल्यातील क्रीडाप्रेमींकडून मंत्री केसरकर यांचे व जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर यांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत.