ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ४१ वा वर्धापनदिन १ जुलै रोजी प्रधान कार्यालय, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे साजरा करण्यात आला. यावेळी हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संचालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात ४१ दात्यांनी रक्तदान केले. उद्धाटन अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बँकेच्या नवीन फिचर्सचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मायक्रो एटीएम डिवाईसेसमधुन भारतातील कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड धारकाला पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेती पुरक व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. यावर्षी ३१०० कोटी रूपये ठेवींचा टप्पा गाठत पावणे ६ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. आज महाराष्ट्रातील पहिल्या तीन अग्रगण्य बँकांमध्ये आपल्या बँकेचे नाव घेतले जाते. गुणात्मकदृष्ट्या आज सिंधुदुर्ग बँक महाराष्ट्रात एक नंबरचे स्थानी आहे याचे सर्व श्रेय जिल्हावासियांना आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच डोअर स्टेप बँकींग सुविधेमध्ये व अल्पबचत कामकाजात चांगले योगदान देणारे अल्पबचत प्रतिनिधी रवींद्र आदम (पडेल), विष्णू जोशी (आरोंदा), अभिजीत वंजारे (घोटगे), भैरवनाथ बुगडे व सुनील सांबारी (दोडामार्ग), कमल तिरवडेकर (कुडाळ) यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, आत्माराम ओटवणेकर, विठ्ठल देसाई, संदिप परब, समीर सावंत, संचालिका प्रज्ञा ढवण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी, संस्था प्रतिनिधी, अल्पबचत प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.