उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड व सांडपाण्याचा चिखल करून विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सुरू असल्याप्रकरणी गटविकास अधिकायांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पहाणी करत रस्ता मोकळा करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला. प्रशासनाच्या या तात्काळ कारवाईला प्रतिसाद म्हणून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे तहसीलदार किवा प्रांत यांच्या कार्यालयाला ग्रामस्थांनी वेळोवेळी भेटी देऊन आणि अर्ज विनंत्या करून सुद्धा जवळपास ८७ दिवस उलटले असूनही विद्यार्थी आणि विद्यादान करणारे शिक्षक यांच्या होणाया हालअपेष्टा यांची काडीमात्र दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. याच प्रशासकीय निष्क्रियतेचा निषेध म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी पालक, शाळा हितचिंतक आणि समस्त शिक्षणप्रमी उभादांडावासीय यांनी १४ ऑगस्ट २०२४च्या आधी विद्यालयाकडे जाणाया रस्त्यातील सर्व कथित अनधिकृत बांधकामे तोडून आणि सर्व अडथळे दूर करून यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजरोहणासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांना ताठ मानेने शाळेकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा अशी विनंती संयुक्त निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना केलेली आहे. मात्र, तसे न झाल्यास १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्वातंत्र्यदिनी कोणतेही उपोषण होणार नाही याची काळजी घेण्याचे कडक निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेले असतानाच खुद्द शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात हे उपोषण होणार की विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.