वेंगुर्ला नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन, पथदीप पोल बसविणे, मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे या कामांचा लोकार्पण सोहळा तसेच अग्निशमन केंद्र, मांडवी जेट्टी, नगरपरिषद व्यायामशाळा आदींचे विकसन करणे आणि पिराचा दर्गा येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे या कामांचा भूमीपूजन समारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 28 जुलै रोजी संपन्न झाला.
यावेळी प्रशासक हेमंत निकम, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, सुनील डुबळे, नितीन मांजरेकर, प्रशांत आपटे तसेच नागरीक उपस्थित होते.
महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (राज्यस्तर) अनुदान योजनेतून अग्निशमन वाहनाचे खरेदी करण्यात आलेली असून यामध्ये 5000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, 1000 लिटर क्षमतेची फोम बेस टाकी, 40 फुटउंचीची शिडी, जादा पंपाची व्यवस्था, मॉपर, दोन गन पाईप व दोन अतिरिक्त पाईप लावून आग विझवण्यासाठी वापर करता येणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून 136.00 लक्ष रकमेचे विविध भागात पथदीप पोल बसविण्यात आलेले असून शहरातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटसंदर्भात विशेषतः पावसाळ्यात झाडे पडून लाईट नसण्याच्या समस्या कमी होणार आहेत. 60 वॅट क्षमतेच्या एल.ई.डी. लाईटसह 7 मीटर उंचीचे आकर्षक 181 पोल आहेत. मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहामध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सिंधुरत्न समृद्धी विकास योजनेमधून 36.50 लाखांचा निधी प्राप्त झालेला असून यातून दररोज 40 सोलार विज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या वीज देयकांच्या खर्चावरील भार कमी होणारा आहे.
मांडवी जेट्टीचे विकसन करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन अनुदान योजनेतून मंजूर झालेले असून यासाठी 50 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जेट्टीची लांबी 14.70 मीटर असून रुंदी 9 मीटर आहे. या जेटीचा फायदा स्थानिक मच्छिमार व पर्यटकांना होणार आहे. नगरपरिषद व्यायामशाळा इमारतीचे विकसन करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून 30 लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे. अत्याधुनिक ए.सी.व्यवस्था, टी.व्ही. व्यवस्था, साऊंड सिस्टीम व आकर्षक रबरी टाईल्ससह ही व्यायामशाळा अद्ययावत करण्यात येणार आहे. पिराचा दर्गा येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून 10 लाखांचा निधी प्राप्त झाला असून यामध्ये नागरिकांना प्रार्थना करण्यासाठी 9 मीटर लांबी व 4.5 मीटर रूंदीच्या शेडचे बांधकाम, आकर्षक कमान, सुसज्ज बैठक व्यवस्था, पाण्याची आणि लाईटची व्यवस्था तसेच आवश्यक त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणेत येणार आहेत.