मुरडत आली श्रावणधार नेसुनी शालू हिरवागार अवनीनेही केला शृंगार
चित्त पावन करणारा, मनःशांती देणारा सृष्टीचा सर्वांत मोठा सोहळा म्हणजेच श्रावणमास. घन ओथंबून येणारा श्रावण सूर्यकिरणांची सोनेरी किनार लेवून सृष्टीला नखशिखांत पुलकित करतो. सृष्टीचा हा नयनरम्य सोहळा कवी मनापासून लपून राहिला तर नवलच, सृष्टीचे सगळे चैतन्य पाऊस या एका शब्दात एकवटलेले आहे. हाच पाऊस वेंगुर्ल्यात आनंदयात्री वाङ्मय मंडळाने आयोजित केलेल्या ‘घन ओथंबून येती’ कविसंमेलनातही मनसोक्त बरसला.
येथील साई दरबार हॉल येथे ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संमेलनात जिल्हाभरातील कवी, कवयित्रीनी पावसावर स्वतः लिहिलेल्या कविता सादर करून खऱ्या अर्थाने रंगत आणली. या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान विजयदुर्ग येथील प्रतिभावान कवयित्री सुनंदा कांबळे यांनी भूषविले. प्रसिद्ध योग शिक्षिका डॉ. वसुधा मोरे यांनी दीप प्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत, तथा निवृत्त शिक्षक अजित राऊळ, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, वेेंगुर्ले पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र मातोंडकर, आनंदयात्रीचे पदाधिकारी संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक वृंदा कांबळी यांनी केले, तर सूत्रसंचालन आनंदयात्रीचे सचिव सचिन परुळकर यांनी केले.
गेली अनेक वर्षे समाजसेवेत कार्यरत राहून योगसारख्या शास्त्रात पारंगत असलेल्या डॉ. वसुधा मोरे यांचा या कविसंमेलनाच्या निमित्ताने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. आनंदयात्रीचे पदाधिकारी संजय पाटील यांचाही मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. वसुधा मोरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर आधारित दहा पुस्तकांचा संच आनंदयात्रीला भेट दिला. कविसंमेलनाची सुरुवात संमेलनाच्या अध्यक्ष सुनंदा कांबळे यांच्या कवितेने झाली. त्यानंतर अजित राऊळ यांनी आपली पावसावर आधारित कविता सादर केली.
ढगांच्या तालावर ही नर्तन करते विजांच्या भीतीने मिठीत शिरते
लाजली धरती, तुटला आकाशी तारा ह्यो सुटला बघा कसा थंडगार वारा
अशा शब्दात ठेका धरायला लावणाऱ्या लयीवर कुडाळ येथील कवयित्री अदिती मसुरकर यांनी पावसावर आधारित स्वरचित लावणी सादर केली. आकाशी पाऊस दाटून आल्यावर सगळी सृष्टी चैतन्यमय होऊन जाते. काळ्या ढगांच्या आडून धरणीवर पडणाऱ्या तुषारांनी जीवसृष्टीला नवीन उभारी मिळते. पावसाच्या आगमनानंतर सुटणारा थंडगार वारा मानवी जीवाला सुखावून सोडतो. सृष्टीचा हा नयनरम्य सोहळा त्यांनी आपल्या कवितेतून लावणीच्या रुपाने रसिकांपुढे व्यक्त केला.
हर्षसखी, स्पर्शसखी, छंदसखी स्पंदसखी, मृदगंधसखी, आनंदसखी
ऋतू पुष्पांच्या अमृतधारा, झळाळलेला मोरपिसारा
भाळावरती पहाटवारा बांधिलास तू गंधसखी
पावसाचे आणि कवीचे नाते युगांयुगांचे आहे. पावसाची अनेक रुपे अनेक कवींनी कल्पनांच्या विविध छटांमधून रेखाटली आहेत. कुणाला पाऊस हवासा वाटतो, तर कुणाला नकोसा, पावसामुळे सृष्टी नवचैतन्याने न्हावून येते आणि पावसामुळे जमिनीवर चिखलाचे साम्राज्यही तयार होते. पण शेवटी पावसाशिवाय सृष्टीला जीवन नाही. त्यामुळे मानवजातीच्या कल्याणासाठी वरदान ठरलेला पाऊस कुडाळ येथील कवी योगीश कुलकर्णी यांनी छंदसखी या कवितेतून व्यक्त केला.
घननिळ्या नभांगणी, ढग डोलवितो वारा लढताना विजासंगे, कोसळती जलधारा
पावसात भिजतात, शब्द शृंगारत जातो ऋतू पावसाळी ओला, शब्द शब्द गात गातो
ओथंबून येणाऱ्या घनामुळे ऋतूचे सोहळे साजरे होतात. गात्रंगात्र पुलकित होणाऱ्या चैतन्याने असंख्य जीवांना जीवन मिळते. पाऊस खट्याळ असला तरी सृष्टीचा तो तारणहार जाहे. सृष्टीचा हा सोहळा कवीमनापासून वेगळा राहूच शकत नाही. त्याची असंख्य रुपे कविता, गीतांच्या माध्यमातूनही आपल्याला दिसून येतात. असा हा पाऊस शिरोडा येथील कवयित्री स्नेहा नारिंगणेकर यांनीही आपल्या कवितेतून रसिकांपुढे व्यक्त केला.
डॉ. संजीव लिंगवत, जान्हवी कांबळी, प्रा.सुरेखा देशपांडे, फाल्गुनी नार्वेकर, वासुदेव पेडणेकर, स्मिता नाबर, हेमा सावंत, मानसी वाईकर, संकेत येरागी, चांदणी भगत, संजय घाडी, रामा पोळजी, प्राजक्ता करंगुटकर, विजयश्री पेडणेकर यांनीही आपल्या आशयघन कवितांनी कविसंमेलनात शब्दरुपी पावसाची मनसोक्त बरसात केली. श्राव्या अनुप कांबळी उभादांडा केंद्रशाळेच्या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ‘असाही पाऊस तसाही पाऊस’ या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. शालेय जीवनात तिचा पावसाविषयी असलेला दृष्टीकोन आणि योग्य शब्दांच्या माध्यमातून कवितेची केलेली बांधणी याबद्दल तिचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले. मिटल्या स्मृतींना भिजवून धार गेली, आठवांचे मोहोळ निरखून घे उन्हाळा या महेंद्र मातोंडकर यांनी सादर केलेल्या कवितेने या कविसंमेलनाची सांगता झाली.
विजयदुर्ग येथील कवयित्री सुनंदा कांबळे यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्ष या नात्याने संमेलनात सादर झालेल्या कवितांचे समिक्षण केले. पावसाच्या कवितांमधील नवकल्पनांचे त्यांनी भरभरून स्वागतही केले. छोट्या काव्याच्या कवितेला मनापासून दाद देत हे कविसंमेलन यादगार झाल्याची पावती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या ठेवणीतील काही मालवणी कविता सादर करून हास्यकल्लोळ माजविला. कोजागिरी, गावातल्या रामायण नाटकाची गजाल, ताडकण म्हातारी, माझा पहिला प्रेम या कविता त्यांनी साभिनय सादर करून कविता कशी असावी व ती कशी सादर करावी याचे प्रात्यक्षिकच करून दाखविले. आजारपणामुळे आपली दृष्टी अधू झाली असली तरी कविता लक्षात ठेवून ती कशी प्रभावीपणे सादर करता येते, हेही त्यांनी दाखवून दिले. सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर आभार सचिन परुळकर यांनी मानले.