‘सुरंग‘ हे जगभरात मिळणारी दुर्मिळ प्रजातींमध्ये येते. त्याची लागवड भविष्यात सुगंध दरवळण्यासाठी आणि शाश्वत प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, बॅ. खर्डेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात एनसीसी, एनएसएस तसेच इकोटुरिझम कोर्सच्या विद्यार्थ्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे २५ सुरंगीच्या रोपांची लागवड केली. याच कार्यक्रमात इकोटुरिझम डिप्लोमा कोर्सच्या निकाल जाहीर झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले. ३५ विद्यार्थ्यांनी तीन महिन्याचा लोकल फिल्ड एक्सपर्ट प्रोग्रॅम आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी शाश्वत पर्यटन विकासातील संधी व राष्ट्रीयधोरण याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या अभ्यासक्रमाचा आढावा घेत, आखलेल्या सहलीचे परिक्षण करून, सर्वोत्कृष्ट सहल संयोजक म्हणून किशोर सरनोबत यांचे नाव समन्वयक डॉ.धनश्री पाटील यांनी घोषित केले.
कोकण ट्रॅव्हल क्लबचे प्रतिक गावडे व निलेश चेंदवणकर यानी कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना सहल नियोजनाच्या व सहलीच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. निसर्ग संवर्धनातून शाश्वत पर्यटन कसे आयोजित करावे याचे कौशल्य विकसित करण्यासाठी अनेक मान्यवर तज्ज्ञांची व्याख्याने व क्षेत्र भेटीचे आयोजन केले होते. वेंगुर्ला रॉक्स समुद्र सफर, कांदळवन सफारी, रांगणागड, यशवंत गड, नरेंद्र डोंगर, आंबोली येथील जैवविविधता याबरोबरच कोळोपीची कातळ शिल्पे, वालावलची कावी कलाकृती, ठाकर पर्यटनातून कटपुतली, चित्रकथी आदी कलेसाठी कोकणात पर्यटन व्हावे, तसेच आंब्याच्या बागेमध्ये ही माहितीपूर्ण सहल आयोजन आणि भात लावणी व परसबाग लागवड आयोजन यासारखे उपक्रम कोकण पर्यटनामध्ये समाविष्ट करण्यात आले व याचे प्रोजेक्ट आखण्यात आले. कोर्सचे शिक्षक प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांनी मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सुरेखा धुरी यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक डॉ.पी.आर.गावडे यांनी आभार मानले.