सेवानिवृत्त न्याय अधिक्षक एन. पी. मठकर यांना कायद्याची पदवी

माणूस हा आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी असतो. जो नेहमी शिक्षणाची वृत्ती ठेवून मेहनत घेतो, तीच व्यक्ती आयुष्यात नवनवीन यश संपादन करीत असते. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात न्याय विभागाच्या अधीक्षक पदावरून सुमारे 37 वर्षे सेवा बजावून नोव्हेंबर 2022 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एन. पी. मठकर यांनीही वयाच्या 60 व्या वर्षी अशीच किमया केली आहे. त्यांनी 56.26 टक्के गुण मिळवून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे ज्या न्यायालयात न्यायाधीशांनी न्याय लिहिण्याचे काम केले, त्याच न्यायालयात आता मठकर वकील म्हणून न्यायाधीश यांच्यासमोर उभे राहून कायद्याने बाजू मांडणार आहेत.

      अभ्यास करण्यासाठी वय लागत नाही. वय झाले म्हणून अभ्यास थांबविणे चुकीचे आहे. मठ-वेंगुर्ले येथील नामदेव फटू मठकर या 60 वर्षांच्या व्यक्तीने प्रचंड जिज्ञासा बाळगून वकील होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मठकर यांनी 1 मार्च 1986 ला रत्नागिरी जिल्ह्याच्या आस्थापनेवरील सावंतवाडी मुख्य न्याय दंडाधिकारी येथे कनिष्ठ लिपिक म्हणून आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर ते सहायक अधीक्षक प्रशासन, न्याय अधीक्षक या पदापर्यंत पोहोचले. ही 36 वर्षे 9 महिन्यांची सेवा करून ते वयाच्या 58 व्या वर्षी 31 नोव्हेंबर 2022 ला सेवानिवृत्त झाले. ही सेवा बजावत असताना कणकवली न्यायालयात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायद्याच्या परीक्षेस बसण्याची रीतसर परवानगी तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांच्याकडे मागितली होती. त्यांनी तशी परवानगी दिली होती.

      2019 मध्ये मठकर यांनी कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजात आपल्या वकिलीचा अभ्यास सुरू केला. मुंबई विद्यापीठाने 24 जुलै 2024 ला जाहीर केलेल्या निकालात ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी बी प्लस म्हणजेच 56.26 टक्के गुण मिळविले आहेत. मटकर हे सेवानिवृत्त अधीक्षक आहेत.

Leave a Reply

Close Menu