राष्ट्रीय क्रीडा सप्ताहानिमित्त २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत अणसूर पाल हायस्कूलने विविध क्रीडा विषयक उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले. त्याबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व फिटइंडिया यांच्यावतीने अणसूर पाल हायस्कूल अणसूर शाळेला फिट इंडिया मानांकनाचे सन्मानपत्र व फिट इंडिया फ्लॅग प्राप्त झाले आहे. या मानांकनावर राष्ट्रीय क्रीडादिनी एकता विष्णोई मिशन डायरेक्टर फिट इंडिया व सिद्धार्थ सिंग जॉईंट सेक्रेटरी क्रीडा विकास भारत सरकार यांची स्वाक्षरी आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतभर उत्साहात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शाळेच्या दर्शनी भागात मेजर ध्यानचंद यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले व विद्यार्थी खेळाडूंनी फिट इंडिया फ्लॅग उंचावून क्रीडा शपथ घेतली. शाळेतील विद्यार्थीनी कॅरमपटू पूर्वा चव्हाण व बुद्धीबळपटू औदुंबर परब यांनी तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, दत्ताराम गावडे व देऊ गावडे यांच्या हस्ते फिट इंडिया प्रिसिएशन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक विजय ठाकर, अक्षता पेडणेकर, चारूता परब, सुधीर पालकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळा व विद्यार्थी खेळाडूंचे अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, सेक्रेटरी लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.