शनिवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारपासूनच गणेशभक्तांनी आपापल्या गणेशमूर्त्या घरी न्यायला सुरूवात केली आहे.
दिवसेंदिवस गणपती पूजन करणा-या भक्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने मूर्तीशाळाही वाढल्या आहेत. त्यात अलिकडे वाहतुक व्यवस्थाही उपलब्ध झाली आहे. तसेच गावोगावी सुबक आणि आकर्षक गणेशमूर्त्या घडविणारे मूर्तीकार निर्माण झाले आहेत. त्यामुळे हौशी गणेशभक्त अशा मूर्तीकारांचा शोध घेऊन त्यांच्याकडे आपली गणेशमूर्ती बनविण्यासाठी देत आहेत. गणपती घरी आणत असताना पावसाचा व्यक्त्यय नको यासाठी भाविकांनी गुरूवारपासूनच मोठमोठ्या वाहनांच्या सहाय्याने घरी आणायला सुरूवात केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी माटवी, आरास आदी कामे आटपून भाविक आपापले गणपती घरी घेऊन जाणार आहेत.