दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल परब फाऊंडेशन आणि भाजपाच्या माध्यमातून आपण ते करेन, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ला येथे केले.
येथील साई दरबार हॉलमध्ये भाजप वेंगुर्ला व भाजप दिव्यांग विकास सेल यांच्यावतीने विशाल परब फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील सुमारे २०० दिव्यांग बांधवांना गणेश चतुर्थीनिमित्त शिधा वाटप करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजप दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सहसंयोजक श्यामसुंदर लोट, कोषाध्यक्ष सुनील तांबे, वैद्यकीय विषयक प्रभारी सदाशिव राऊळ, वैभववाडी तालुका प्रभारी सविता सकपाळ, मालवण येथील शासकीय योजना प्रभारी तुळशीदास कासवकर, साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास संस्थेच्या अध्यक्ष रूपाली पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, भाजपचे जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.
अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. वेंगुर्ला तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, किवा ज्यांनी विविध योजनांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत अशांचा डेटाही यावेळी तयार करण्यात आला. मागणीनुसार दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन श्री.शिगाडे यांनी दिले.
विशाल परब यांनी श्री. शिंगाडे यांच्या साईकृपा दिव्यांग विकास संस्थेसाठी संगणक देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसन्ना देसाई यांनी केले.