‘स्वच्छता ही सेवा‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत कालेलकर सभागृहात महिला स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन महिला कर्मचारी यांच्यासाठी २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम यादगार ठरला. यात ३० महिलांनी सहभाग घेतला. ऐश्वर्या सावंत ही ‘पैठणी‘ची मानकरी ठरली तर माधवी कोटमेकर ही उपविजेती ठरली.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, पत्रकार भरत सातोसकर व कांचन कंकाळ यांच्या हस्ते झाले. ऐश्वर्या सावंत यांना कांचन कंकाळ यांच्या हस्ते पैठणी देऊन तर माधवी कोटमेकर यांना माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांच्या हस्ते आकर्षक भेट देऊन सन्मानीत करण्यात आले.
महिला सफाई कर्मचारी आपल्या घरगुती जबाबदा-या सांभाळत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असतात. ‘‘खेळ पैठणीचा‘‘ या कार्यक्रमामुळे त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळाला तसेच त्यांना सहका-यांसोबत आनंदाने खेळ खेळण्याची आणि मैत्री वाढवण्याची संधी मिळाली. महिला कर्मचा-यांच्या कल्याणासाठी आवश्यक असलेले पाठबळ वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे नियमितपणे देण्यात येईल असे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सावंतवाडीचे होम मिनिस्टर फेम शुभम धुरी यांनी केले.