सरकारतर्फे साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ज्ञानपिठ पुरस्कार आतापर्यंत महाराष्ट्रातील चारच साहित्यिकांना मिळाला असून त्यापैकी वि.स.खांडेकर आणि विदा करंदीकर हे सिधुदुर्गच्या मातीत घडलेले साहित्यिक आहेत. याचा आपणाला गर्व असायला हवा. आपल्या जिल्ह्यातील साहित्यिकाचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे असे केंद्र जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला हवे. यातून नवसाहित्यिकांना उर्जा मिळेल, असे प्रतिपादन जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी यांनी केले.
वेंगुर्ला हायस्कूलमध्ये थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे साहित्य जागर उपक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपिठावर मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सचिन दळवी, प्रसिद्ध मालवणी कवी विनय सौदागर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, आनंदयात्रीच्या अध्यक्षा वृंदा कांबळी, सातेरी देवस्थानचे मानकरी रविद्र परब, चारूता दळवी, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.डी.कांबळी आदी उपस्थित होते.
आजच्या पिढीला मोबाईलच्या व्यसनातून मुक्त करण्यासाठी वाचनाचा व्यासंग वाढला पाहिजे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्यातील साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध असलेले दालन सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी कंकाळ यांनी दिले. मुलांना कळेल, उमजेल, त्यांत त्यांना रस वाटेल अशारितीने त्यांच्याशी व्यक्त झाल्यास मुले साहित्यातही रस घेऊ लागतील असे विनय सौदागर म्हणाले.
जयवंत दळवी हे आपल्या भागाचे खुप मोठे साहित्यिक आहेत. त्यांच्या साहित्यातील असंख्य माणसे आजही आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. दळवींचे साहित्य मानसशास्त्रीयदृष्ट्या माणसाला अधिक प्रगल्भ करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असे वृंदा कांबळी म्हणाल्या. आनंदयात्रीच्या सदस्य फाल्गुनी नार्वेकर यांनी जागर साहित्याच्या या उपक्रमावर आधारित गीत सादर केले. तर कवी स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी कार्यक्रमादरम्यान रचलेले काव्य कार्यक्रमाच्या शेवटी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
या कार्यक्रमाला आनंदयात्रीचे संजय पाटील, प्रितम ओगले, महेश राऊळ, वेंगुर्ला हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.सचिन परूळकर यांनी, सूत्रसंचालन महद्र मातोंडकर यांनी तर आभार वृंदा कांबळी यांनी मानले.