वीस किलो रद्दीपासून १ हजार बीजगोळ्यांची निर्मिती

      माझी वसुंधरा अभियान ५.० व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२५ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत महिला बचत गटांसाठी बांबू, शेवगा वाळा तसेच घरगुती रोपवाटिकेसाठी कलम तंत्र व पर्यावरणपुरक बीजगोळे तयार करण्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या बचत गटाच्या महिलांनी २० किलो पेपर रद्दीपासून १ हजार पेक्षा जास्त बीजगोळे तयार केले. या बीजगोळ्यांमध्ये विविध देशी प्रजातींच्या बियांचे रोपण करून पावसाळी हंगामात त्याची लागवड करण्यात येणार आहे.

       या कार्यशाळेत जैव विविधता संवर्धन, पोषण व आरोग्याच्या दृष्टीने बांबू, शेवगा व वाळ्याचे महत्त्व सांगण्यात आले. केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेल्या मिशन बांबू योजनेअंतर्गत बांबू शेतीमधून आर्थिक उत्पन्नाची माहिती देण्यात आली. प्रश्नमंजूषेद्वारे महिलांनी हा विषय समजून घेतला. बांबू व शेवगा लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी महिलांना बांबूची रोपांचे वाटप करण्यात आले.  

       ‘घरगुती रोपवाटीकेसाठी कलम तंत्र‘ या माहिती सत्रात परसबागेमधील कलमतंत्राच्या सहाय्याने गुलाबासारख्या फुलझाडे व फळ झाडांच्या फाद्यांचे कलम बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. जैवविविधता संवर्धनातून विविध फळझाडे व फुलझाडांची घरच्या घरी रोपवाटिका कशी बनवावी याबाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सहभागी महिलांना त्यांच्या आर्थिक वाढीसाठी विविध १५ प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

        यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, सहाय्यक कार्यालय अधिक्षक वैभव म्हाकवेकर, शहर समन्वयक पूर्वा मसुरकर, स्वयंप्रभा फाऊंडेशनचे अतुल राऊत व इतर पदाधिकारी तसेच महिला बचत गटांच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

       पर्यावरणाचा ढासळणारा समतोल पाहता हवामान बदल आणि त्याचा आपल्या दैनंदिन राहणीमानावर तीव्र परिणाम होत आहे. परसबागेत पोषणयुक्त भाजीपाला व फळझाडे दैनंदिन आहारात पोषणासोबतच पर्यावरण संवर्धन देखील करू शकतात. कमी कालावधीमध्ये झाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी बीजगोळ्यांसारख्या नवकल्पनांची आवश्यकता आहे. वेंगुर्ला शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला बचत गट यांच्या सहभागातून पुढील कालावधीमध्ये अनेक पर्यावरणपूरक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे नियोजित असून स्वच्छता प्रेमी वेंगुर्लावासीयांनी वसुंधरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.

Leave a Reply

Close Menu