साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन संपन्न

         बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण व मुक्तांगण, वेंगुर्ला या संस्थांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते झाले. साने गुरूजी हे महाराष्ट्राला लाभलेले असामान्य व्यक्तिमत्व होते. प्रखर जीवननिष्ठा, सेवा, त्याग आणि प्रामाणिकपणा ही जीवन मूल्ये साने गुरूजींनी आयुष्यभर सांभाळली. त्यांच्या अंगी समाजहिताच्या बाबतीत प्रसंगी अतिशय कणखर निर्णय घेण्याची अद्भुत क्षमता होती. शिक्षक या सामाजिक संस्थेला त्यांनी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांचा आदर्श घेऊन आजच्या शिक्षकांनी शिक्षणासोबतच समाजसेवेचे व्रत अंगिकारले पाहिजे असे आवाहनात्मक प्रतिपादन रमेश पिंगुळकर यांनी केले. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी रमण किनळेकर, शिक्षक नेते संतोष परब आदी उपस्थित होते. ‘खरा तो एकची धर्म-जगाला प्रेम अर्पावे‘ ही साने गुरूजींची विश्वप्रार्थना अंगीकारून मूल्याधारित समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कारण आजचा समाज दुभंगलेला असून तो द्वेष, हिंसा, क्रौर्य आणि चंगळवाद यांच्या आहारी जात चालला आहे. साने गुरूजींच्या साहित्याचे परिशीलन हे त्यावरील खरे उत्तर असल्याचे वृंदा कांबळी म्हणाल्या. साने गुरूजींना अपेक्षित असलेला समाज घडवणे आणि निकोप सामाजिक संस्कृती रूजवण्याचे खरे कार्य आजच्या शिक्षकांनी हाती घ्यायला हवे. साने गुरूजींसाठी तिच खरी आदरांजली ठरेल असे रमण किनळेकर म्हणाले.

       साने गुरूजी हा महाराष्ट्राला लाभलेला अमूल्य ठेवा असून आजच्या सामाजिक आणि धार्मिक विद्वेषाच्या काळात साने गुरूजींच्या विचारांवर अविचल निष्ठा ठेवून काम करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजचे शिक्षक, साहित्यिक यांनी साने गुरूजींच्या वाटेने चालण्याचे कष्ट घेतले पाहिजेत असे अॅड.देवदत्त परूळेकर यांनी स्पष्ट केले. ‘साने गुरूजींच्या कथा‘ या सत्रात भरत गावडे, श्यामल मांजरेकर, प्राजक्ता आपटे, देवयानी आजगावकर, महेश बोवलेकर यांनी परिणामकारक कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखक अजित राऊळ यांनी भूषविले. कवी संमेलनाचे तिसरे सत्र प्रथितयश कवी प्रा.मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांनी कवितेची निर्मिती प्रक्रिया आणि तिच्यातील जटिलता यावर भाष्य केले. साने गुरूजींची कविता आजही समाजमनाला हाक देत असून आजच्या कविनी त्यांचा मानवतावादी धर्म जाणून घेतला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी योगेश सकपाळ,सरिता पवार, मनोहर परब, नीलम यादव, प्राजक्ता आपटे,किशोर कदम, श्यामल मांजरेकर, संजय घाडी, राजश्री घोरपडे,प्रज्ञा मातोंडकर, योगिता सातपुते, प्रतिभा चव्हाण, अजित राऊळ, कर्पूरगौर जाधव, एकनाथ जानकर यांनी आपल्या कविता सादर करून सामाजिक स्थितीगतीच्या विविधस्तरांचे दर्शन घडवले. संमेलनास मंगल परूळेकर, सीताराम नाईक, कालिदास खानोलकर, त्रिंबक आजगावकर, चित्रा प्रभूखानोलकर, प्रमिला राणे, रेश्मा पिंगुळकर, विशाखा वेंगुर्लेकर, गुरूदास मळीक, रामचंद्र मळगावकर, पी.के.कुबल, वीरधवल परब आदी उपस्थित होते. कैवल्य पवार यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu