रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ हा दिवस तळकोकणच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस ठरला. विजयाची हॅट्ट्रिक करत तिसयांदा आमदार होणारे नितेश राणे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते नामदार बनले आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आल्याने मंत्री नितेश राणे हेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार हे जवळपास निश्चित आहे.
ना. नितेश राणे यांनी ५३ हजाराचे मताधिक्य घेऊन सलग तिस-यांदा हा विजय मिळवला आहे. आपल्या प्रचार सभांमध्ये, भाषणांमध्ये आक्रमकपणे हिदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरल्यामुळे भाजपच्या नेतृत्वात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झालाच होता. वयाच्या ४२ व्या वर्षी नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांची मागील दहा वर्षाची कारकीर्द पाहता काही गोष्टी ठळकपणे जाणवतात. फार मोठ्या प्रमाणात सभा, मेळावे घेणे, भाषणे करणे यापेक्षा ते लोकांमध्ये थेटमिसळून त्यांच्याशी संभाषण करून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अगदी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही थेट संवाद साधण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येकाला योग्य सन्मान देऊन त्याला आपलेसे करून घेण्याची त्यांची स्टॅटेजी अनेकदा दिसून आली आहे. नितेश राणे जरी यापूर्वी कणकवली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी जिल्हाभरातील अनेक कार्यक्रमांना ते स्वतः उपस्थित राहायचे. जिल्ह्यातील विविध लोक, संस्थांचे पदाधिकारी त्यांना भेटायचे. त्यामुळे जिल्हाभर त्यांचा प्रभाव होताच. आता कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरातील १४ कोटी जनतेचे ते हक्काचे मंत्री झाले आहेत. भविष्यात जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील राजकारणावरील आणि प्रशासनावरील त्यांची पकड मजबूत होईल.
कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ना.नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आली आहे. त्यांचे वडील खासदार नारायणराव राणे यांचे मार्गदर्शन तर त्यांना आहेच. सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत.
इथली मोडकळीला आलेली शासकीय आरोग्य व्यवस्था मोठ्या सुधारणेच्या प्रतिक्षेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय जिल्हा रूग्णालय या सर्वांच्या इमारती चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. परंतु त्यामध्ये रूग्णांवरती उपचार करणाया पूर्ण वेळ डॉक्टरचीच कमतरता आहे. ओरोस येथील जिल्हा रुग्णालय तर गोवा-बांबुळी येथे रूग्णांना पाठवण्याचे रेफरल सेंटर बनले आहे. जरा गंभीर रूग्णांवर येथे उपचार होत नाहीत हे वास्तव नाकारता येणारे नाही. सर्व रूग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध असतात का याचीही देखरेख ठेवणे गरजेचे आहे. या अवस्थेमध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. सिंधुदुर्गात सुरू झालेले शासकीय रूग्णालय चांगल्याप्रकारे कसे काम करेल. सध्या येत असलेल्या अडचणीवर कशाप्रकारे मात करता येईल हे सर्वांनी मिळून ठरवले पाहिजे. राज्यापासून केंद्रापर्यंत सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या राणे कुटुंबीयांना मनात आणले तर हे करणे सहज शक्य आहे. आरोग्य यंत्रणेला भेडसावत असलेल्या या काही महत्त्वाच्या अडचणींचे निराकरण झाले तर जिल्ह्यातील गोरगरीब जनता नितेश राणे व कुटुंबीयांना मनापासून दुवा देईल.
सिंधुदुर्गातील गोवा आणि मुंबई,पुणे येथे होणारे तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यात उद्योग- व्यवसायांना चालना देणारे धोरण हवे आहे. पर्यटन उद्योग भरण्यासाठी त्यामध्ये स्थानिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढण्यासाठी रोड मॅप करून त्याची अंमलबजावणी होणे ही आवश्यक आहे. जिल्ह्यातील रखडलेले सी-वर्ल्ड सारखा प्रकल्प, वेंगुर्ला येथे प्रस्तावित असणारा पाणबुडी प्रकल्प, चीपी येथील बंद पडलेली मुंबई विमान उड्डाणे असे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची धमक नितेश राणे यांच्यामध्ये नक्कीच आहे.
रोजगारासाठीचे प्रकल्प जिल्ह्यात आणत असताना मात्र नितेश राणे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एक खबरदारी जरूर घेण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे जैवविविधतेला धोका पोहोचवणारे मायनिंग, औष्णिक ऊर्जा यासारखे प्रदूषणकारी प्रकल्प जिल्ह्यातून हद्दपार करावेत. निसर्ग-पर्यावरण जपून उद्योगाला चालना देणाया प्रकल्पांचे जनता स्वागतच करेल.
अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर १२ डिसेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड जेएसडब्ल्यू प्रकल्पात वायू गळती झाल्यामुळे परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तब्बल ५० किलोमीटर दूर असलेल्या रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करावे लागले. सुरूवातीला कंपनीने वायुगळतीशी आमचा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी अधिकारी, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून सदर घटनेत कंपनीत दोषी असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जिंदाल कंपनीतील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शासनाची समिती गठित करण्यात आली असून या समितीने प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली असून तिच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची सुरक्षा विषयक काटेकोर तपासणी संबंधित प्राधिकरणांकडून वेळच्यावेळी होते का हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भोपाळ गॅस दुर्घटनेसारखी घटना आपल्या कोकणात व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात कोकणात मोठे औद्योगिक प्रकल्प साकारण्याचे ‘व्हिजन‘ जर सरकारने ठेवले असेल तर मानवी जीवनात अपायकारक ठरणाया घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या घटनेचा धडा घेऊन सिंधुदुर्गसह कोकणात कोणतेही प्रकल्प आणत असताना सर्वोच्च प्राधान्य हे मानवी जीवाच्या सुरक्षिततेला देण्याची गरज आहे. त्याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही याची दखल मंत्री महोदयांनी घेणे गरजेचे आहे.
आरोग्य, रोजगार, पर्यटन यासह अनेक विषयावर सुनियोजितपणे काम करून जिल्ह्याच्या विकासाला मोठी दिशा देण्याचे काम करण्याची संधी या कॅबिनेट मंत्री पदाच्या माध्यमातून ना. नितेश राणे यांना मिळाली आहे. ते निश्चितच या संधीचे सोने करतील याची खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.