मागोवा 2024

28 डिसेंबर 2023 च्या अंकामध्ये पहिल्याच पानावर जानेवारी 2024 पासून वेंगुर्ल्याबाहेरील वाचकांसाठी आर.एन.आय. संदर्भात तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत साप्ताहिक  किरात पोस्टाने पाठवता येणार नाही, अशा आशयाचे वाचकांनी सहकार्य करण्याबाबतचा विनंतीवजा निवेदन प्रसिद्ध केले होते. तब्बल नऊ महिने ही समस्या दूर होण्याकरिता लागले. ही तांत्रिक अडचण दूर करण्याकामी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि त्यांची टीम मदतीला आली. किरातचे स्नेही श्री. मोहन होडवडेकर यांच्या माध्यमातून मा. सुरेश प्रभू यांना पत्राद्वारे किरातची ही अडचण सांगितली. आणि त्यांच्या सहकार्याने गणपतीत आपल्याला आर.एन.आय. कडून येणारे अद्ययावत सर्टिफिकेट प्राप्त झाले. ते पोस्टाला सादर केल्यानंतर महिन्याभरातच म्हणजे ऑक्टोबर महिन्यातील 24 तारखेला आपले साप्ताहिक पोस्टाने पूर्ववत वाचकांच्या हाती आम्हाला देता आले. 31 ऑक्टोबरचा दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचला, याबाबत श्री. मोहन होडावडेकर सर, माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू आणि त्यांची टीम यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानत आहोत.

            या नऊ महिन्याच्या काळात स्थानिक वाचकांनी  प्रसिद्ध होत असलेला ‌‘किरात‌’ कार्यालयातून हाती नेला. व्हाट्सअप, ई-मेल द्वारे मिळणारी पीडीएफ स्वरूपातील अंक वाचत सहकार्य केले. 1922 पासून सुरू झालेल्या साप्ताहिक किरातला काही वेळा अडचणींना सामोरे जावं लागलं. त्याकाळी विशेष सुविधा उपलब्ध नसताना आमचे पणजोबा, आजोबा, बाबा यांनी मोठ्या धैर्याने आणि सातत्याने हा वारसा चालू ठेवला. अशावेळी ‌‘किरात‌’ प्रसिद्ध होत असूनही पोस्टाने पाठवणे शक्य नसल्यामुळे अंक पीडीएफ, किंवा ईमेल द्वारे वाचणं हे काही ज्येष्ठ नागरिक वाचकांसाठी खरोखरीच कठीण होते. पण केवळ आमच्यावरील विश्वास आणि प्रेमळ साथ यामुळेच या काळात वाचक जाहिरातदार, हितचिंतक यांनी समजून घेतले.

            गेल्या 102 वर्षांचा हा वसा सभासद, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या सहकार्याने आणि ‌‘किरात‌‘च्या ‌‘गुडविल‌‘वर उभा आहे. याची प्रचिती नेहमी येत असते. किरातची वाटचाल यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने, लिहित्या हातांनी, जाहिरातदार, देणगीदार यांच्या सहकार्याने अविरत सुरु ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहील.

            2024 या वर्षात साप्ताहिक ‌‘किरात‌‘च्या दिवाळी अंकासह हा अंक धरून 49 अंक  प्रकाशित झाले. वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‌‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‌‘ वाचकांच्या भेटीला आले. यासाठी प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि लेखक संजय घोगळे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत गतकाळातील स्मृतींना उजाळा दिला. सोबत वाचकांसाठी वेंगुर्ल्यातील खाद्य भ्रमंती करवून आणली.

            अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे अदृश्य हात असतात. ते फारसे प्रकाशझोतात नसले तरी त्यांच्या अस्तित्वाचा फार मोठा परिणाम आयुष्यावर होत असतो. त्यांच्या या आठवणी ‌‘शब्द सुमनांजली‌‘ या सदरातून व्यक्त झाल्या आहेत.

            नव साहित्याची ओळख पुस्तक परिचय या विभागातून अनेक मान्यवरांच्या लेखणीतून वाचकांना अनुभवता आली.

      ‌‘लोकल टु ग्लोबल‌‘ अशी ‌‘किरात‌‘मधील लेखांची मांडणी वाचकांना अंतर्मुख करत असल्याच्या प्रतिक्रिया वाचकांनी आमच्यापर्यंत पोहोचविल्या. शिवाय वाचकांची मते, प्रतिक्रियांनाही किरातमध्ये नेहमी स्थान दिले जाते.

            पियुषा सामंत प्रभू खानोलकर, धीरज वाटेकर, यशवंत मराठे, महेंद्र पराडकर, महेंद्र मातोंडकर, प्रथमेश गुरव, ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख, सुनील कुमार सरनाईक, नारायण गिरप, सुरेश ठाकूर, सुनील नातू, सचिन परुळकर, डॉ. मेधा फणसळकर, सीमा मराठे, शशांक मराठे, ॲड. अपर्णा परांजपे – प्रभू, अंजली मुतालिक, श्रुती संकोळी, डॉ. दिनेश कुंभार, उपेंद्र धोंड, संजय तांबे, ॲड.नकुल पार्सेकर,  ॲड. देवदत्त परुळेकर या आणि अशा अनेक मान्यवर लेखकांनी किरातचे विशेष लेख लिहिले. समाजातील बदलत्या घडामोडींचा लेखाजोगा ‌‘प्रासंगिक‌‘ लिखाणामधून वाचकांना विस्तृतरित्या वाचायला मिळावे यासाठी ‌‘किरात‌‘ कायमच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहील.

            ‌‘महिला दिन‌‘, ‌‘गणपती विशेष‌‘, ‌‘दिवाळी अंक‌‘, ‌‘जत्रा विशेष‌‘ या अंकांमधून अनेक नवोदित हातांना प्राधान्य देताना त्यांच्यामार्फत अनेक नाविन्यपूर्ण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला यांच्यापर्यंत पोहचता आले. अनेकांना प्रकाशझोतात आणता आले. www.kiratonline.in या वेबसाईटमुळे अंकातील महत्त्व पूर्ण घडामोडी तसेच स्थानिक वर्तमान पोहोचत असते. तसेच व्हॉटस्ॲपच्या माध्यमातूनही ‌‘किरात‌‘चा ‌‘ई‌‘ अंक सर्वदूर अगदी परदेशातही पोहचत आहे.

            ‌‘किरात दिवाळी अंक 2024 हा संगीत विषयाला वाहिलेला करण्याचा प्रयत्न केला. विषयाची व्याप्ती पाहता सर्व समावेश करण शक्य नव्हतं तरी मालवणी मुलूखातील मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेले संगीतकार श्री. विजय नारायण गवंडे, कोकणच्या पंचकन्यांनी साकारलेला द कोकण कलेक्टिव्ह म्युझिकल बँड आणि त्यांच्या प्रवासाची ओळख मुलाखत विभागातून, शेखर पणशीकर, अपर्णा परांजपे-प्रभू, यशवंत मराठे, बाळकृष्ण लळीत, विजयकुमार फातर्फेकर, क्रांती गोडबोले-पाटील यांनी संगीत विषयाला वाहिलेले लेख असा सामवेश किरात दिवाळी अंकातून केला आहे. संगीत आपलं जगणं समृद्ध करतं. वाद्यांच्या सुरातून उलगडणारं वेगळं विश्व यंदाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर ख्यातनाम चित्रकार सुनील नांदोस्कर यांनी साकारले आहे. ते आवडल्याचे तसेच हा विशेष विभाग आवडल्याचे अनेक फोन पत्र वाचकांनी पाठवल्याने आम्हालाही नवीन काही करण्याची प्रेरणा देऊन गेला. यावष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी देखील किरात दिवाळी अंकाच्या या विशेष विभागाचे कौतुक केले.

            दरवषप्रमाणे प्रथित यश तसेच नवोदित लेखकांच्या कथा, कविता, प्रवासवर्णन, ललित लेख, राशिफल, मिश्किली अशी भरगच्च साहित्यिक मेजवानी या दिवाळी अंकातून वाचकांना वाचायला मिळाली.

            नवीन वर्षात ‌‘किरात‌‘ नव्या संकल्पनांसोबत जुन्या-नव्या सदरांसह आपल्या भेटीला येईल.

            ‌‘किरात‌‘ला सहकार्य करणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांचे मनःपूर्वक आभार! ‌‘किरात‌‘ परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Close Menu